---Advertisement---

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत सोसायटी पेक्षा ग्रामपंचायतकडे लक्ष !

By team
On: April 27, 2025 2:20 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावरील गर्दी पाहता मोठ्या चुरशीने मतदान होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघापेक्षा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला, नान्नज, तिऱ्हे, मंद्रूप, आहेरवाडी, निम्बर्गी, वळसंग, बोरामणी आठ मतदान केंद्रावर रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात आले आहे. सकाळी आठ ते दहा या दोन तासात 20 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारी समोर आली परंतु त्यानंतर गर्दी पाहता पुढील दोन तासात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून 11, ग्रामपंचायत मतदार संघातून चार, व्यापारी मतदारसंघातून दोन आणि हमाल तोलार मतदारसंघातून एक अशा 18 जागा निवडून द्यायचा आहेत. माजी चेअरमन दिलीप माने यांनी तिऱ्हे मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच निम्बर्गी या मतदान केंद्रावर सुरेश हसापुरे यांनी मतदान केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्या पॅनल विरोधात राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पॅनल उभे केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांमध्ये बाजार समितीसाठी लढत असल्याने कोण जिंकणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला आहे.

उत्तर तालुक्यातील नान्नज या गावी असलेल्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे, उमेदवार तथा भाजपचे युवा नेते मनीष देशमुख यांचे बंधू रोहन देशमुख हे ठाण मांडून असल्याचे दिसून आले. तसेच याच मतदान केंद्रावर उमेदवार गणेश वानकर, युवानेते पृथ्वीराज माने, उमेदवार अविनाश मार्तंडे हे सुद्धा ठाण मांडून आहेत. सर्वाधिक मतदान हे सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला या ठिकाणी असल्याने तिथे मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. व्यापारी मतदारसंघात मुस्लिम समाजातून एकच उमेदवार आहे पण यंदा बंडखोरी झाल्याने लिंगायत समाजातून तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्यामुळे त्या निकालाकडे ही सर्वांचे लक्ष राहणार आहे. याच मतदान केंद्राच्या परिसरात दिलीप माने यांच्या ब्रह्मदेव दादा माने बँकेचे मुख्यालय असल्याने तिथे मतदारांसाठी चहापाण्याची सोय केल्याचे पाहायला मिळाले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!