मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या महिला नेत्यां एकमेकावर टीका करीत असल्याचे समोर आले आहे. ज्या लोकांना साधे नागरिक शास्त्र कळत नाही, त्या लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकी देऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. चित्रा वाघ यांना फडणवीसांच्या गूड बूकमध्ये राहायचे आहे हे आम्हाला ठावूक आहे. पण त्यासाठी त्यांनी आपल्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात, असा टोलाही त्यांनी यावेळी त्यांना हाणला.
भाजप आमदार चित्रा वाघ यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीच्या विटंबनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्या आपल्या पोस्टमअध्ये म्हणाल्या होत्या, काय हो 12 मतीच्या मोठ्या ताई. एरवी तुम्ही प्रचंड संवेदनशील आहात असा आव आणता…अगदी रशिया – युक्रेन युध्दावर तुम्ही तावातावाने मतं मांडता, पण तुमच्या मतदारसंघात म्हणजे मुळशी तालुक्यातील पौड गावात जो घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडला त्यावर चार ओळींचे ट्विट टाकून गप्प आहात…?
त्या हरामखोरानं नागेश्वर मंदिरात घुसून अन्नपूर्णा मातेवर अतिप्रसंग केला नाही, तर समस्त हिंदू महिलांना एक चेतावणी दिली आहे. हे तुम्हाला कळलं असेलच… पण तरीही त्या नीच आणि विकृत चाँद शेखचे तुम्ही नावही घेत नाही? तुष्टीकरणाचं राजकारण सुचतंय का..? तुमच्या मतदार संघात दहशतवादी वृत्तीची ही पिल्लावळ आहे… त्यांच्या आणि पहलगाव मधल्या दहशतवाद्यांमध्ये काडीचाही फरक नाही. त्या विकृत लांडग्यांना देवाभाऊ चांगलीच अद्दल शिकवतीलच, पण तुम्हाला मात्र समस्त हिंदू समाज कधीही माफ करू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या.
चित्रा वाघ यांच्या या टीकेनंतर रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसेच त्यांना आपल्या गोळ्या वेळेवर खाण्याचाही सल्ला दिला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की ज्यांना साधं नागरिक शास्त्र कळत नाही त्यांना आमदारकी देऊ नका ओ! आता आरोपीला पकडणार कोण ? पोलीस यंत्रणा. आरोपीला शिक्षा देणार कोण ? न्याय व्यवस्था. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था राखणार कोण ? गृहमंत्री. अशा घटना रोखण्यासाठी धोरण राबवणार कोण ? सरकार. आणि ह्या खडे फोडतायेत सुप्रिया सुळे यांच्या नावाने. आम्हाला कल्पना आहे की तुम्हाला फडणवीस साहेबांच्या Good Books मध्ये रहायचे आहे पण त्यासाठी काही पण ? जरा वेळेवर गोळ्या घेत चला, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.