ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…रोहित पवारांचे विधान चर्चेत !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलवून दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ मे ते ४ मे दरम्यान मुंबईतील वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी ‘राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,’ असे म्हणत आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे.

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, जर या सरकारमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर पुतण्या म्हणून मी त्याचं स्वागतच करेल, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले की, ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्या पदाच्या वर मुख्यमंत्रीपदच राहते. सहाजिकच तुम्ही इतके वर्ष दोन नंबरच्या पदावर राहिला असाल तर तुमची इच्छा मुख्यमंत्रीपदाची व्हावी, असं रोहित पवार म्हणाले. तसेच या सरकारच्या माध्यमातून अजितदादा यांना संधी दिली जात असेल तर त्यांना आवडेलच. तसेच कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना देखील आवडेल. मी त्यांचा पुतण्या म्हणून मला सुद्धा ती गोष्ट आवडेल. ते आता वेगळ्या सरकारमध्ये आहेत. पण अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळत असेल तर त्या गोष्टीचं मी नक्कीच स्वागत करेल. आनंद देखील व्यक्त करेल, असंही रोहित पवारांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!