ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाघाने फक्त पंजा उगारला आहे ; गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था

पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. भारतीय लष्कराने यशस्वी पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्करावर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरू केले आहे. ही फक्त पहिली कारवाई आहे, वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भाष्य केले आहे.

योगेश कदम म्हणाले, जम्मू काश्मीर येथील पहलागममधून पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ला केला होता. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर कायम हल्ला करत राहणे, जगभरातील दहशतवाद्यांना आश्रय देत राहणे, हे पाकिस्तान कायमच करत आला आहे, त्यांनी यातून कधी शिकवण घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन, कारण भारतीय लष्कराला नौदलाला सूट दिली, त्यांनी आपल्या पद्धतीने कारवाई करावी, असे सांगितले, आतापर्यंत अशी सूट कुठल्या पंतप्रधानांनी दिली नव्हती.

पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला, आता तरी पाक शिकवण घेईल, अशी आशा आहे. ही फक्त पहिली कारवाई आहे, वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा बाकी आहे, पण आम्हाला समाधान मिळाले आहे, भारतीय म्हणून हीच भावना वाटते, की पाकव्याप्त काश्मीर लवकरच ताब्यात घ्यावे.

भारत एक विचार घेऊन पुढे जात आहे, तो दहशतवादविरोधी विचार आहे, दहशतवाद संपवण्याचा विचार आहे. शेजारी देश जर दहशतवाद्यांना आश्रय देत असेल, त्यामुळे भारताचे नुकसान होत असेल, गृहराज्यमंत्रिपद दुय्यम आहे, पण भारतीय नागरिक म्हणून वाटते की पाकव्याप्त काश्मीर लवकरच ताब्यात घ्यावे आणि कायमचा धडा शिकवावा, असेही योगेश कदम म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!