अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
, दि.११ : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागाअंतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधन शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत अक्कलकोट तालुक्यात दहा ठिकाणी १६ मे रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली.
इयत्ता दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. बारावीचा निकाल नुकताच लागल्याने पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, पी एम किसान योजना, आर्थिक दुर्बलघटकांचे प्रमाणपत्र,ईडब्ल्यूएस, नॉनक्रिमीलेअर तसेच इतर शैक्षणिक दाखल्याची आवश्यकता असते.सदरचे दाखले विद्यार्थ्यांना विहीत वेळेत देणे आवश्यक आहे. सदरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध भागात शिबीराचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आदेशीत केले आहे.
त्या अनुषंगाने अक्कलकोट शहर व ग्रामीण भागामध्ये १६ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत दाखले विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.जुने तहसिल कार्यालय अक्कलकोट,शेळके प्रशाला वागदरी,ग्रामपंचायत कार्यालय जेऊर, ग्रामपंचायत कार्यालय नागणसूर,नगरपरिषद मैंदर्गी,नगरपरिषद दुधनी,ग्रामीण विद्यालय, चपळगाव,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तडवळ,जिल्हा परिषद शाळा, करजगी, तलाठी कार्यालय किणी याठिकाणी
आयोजित करण्यात आले आहेत. या शिबिराचा पालक तसेच विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.