ध्यास विश्वसार्ह बातमीचा

छगन भुजबळांनाच पालकमंत्री करावे लागेल ; जयंत पाटलांचा खोचक टोला !

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत ही चांगली गोष्ट झाल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत त्यांनी छगन भुजबळ यांच्यासाठी पालकमंत्री पद देखील देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुरुवातीला त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले होते. आता त्यांना घेण्यात आले आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यांना याचा आनंद झाला असेल. छगन भुजबळ यांना खूप अनुभव आहे आणि मंत्रिमंडळाला अनुभवाची गरज असते.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, रायगड आणि नाशिक मोठे जिल्हे आहेत. नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे निर्णय लवकर घ्यायला हवे होते. मात्र सरकारने याच जिल्ह्याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. छगन भुजबळांसारखा मोठा माणूस येथे आला आहे. त्यामुळे आता त्यांनाच पालकमंत्री करावे लागेल, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे. तसेच छगन भुजबळ यांच्याबरोबर शरद पवार गटाचे दोन व्यक्ती शपथ घेणार म्हणणे हा पोरखेळ असल्याचेही जयंत पाटलांनी म्हटले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, निवडणुकीत शक्य असेल तिथे आम्ही एकत्रित जावू. 25, 26, आणि 27 तारखेला प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ठेवल्या आहेत. त्यामध्ये सर्व चर्चा होतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले, पक्षांतर्गत मोठे बदल होणार आहेत. पण विलीनीकरणाचा विषय तुम्ही चालवत आहात, आम्ही नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सध्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वरचेवर वाढत असल्याचे दिसत आहे. यावर जयंत पाटील म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बीड जिल्ह्यात अतिशय गंभीर आहे. वाटत होते की काही बदल केल्यानंतर परिस्थिती बदलेल. पण तिथल्या लोकांना पोलिसांची जरब बसलेली नाही. आज ही मारहाण होत असेल आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतील तर गुन्हेगारांचे प्रचंड धाडस आहे. बीडला बदनाम करण्याचे काम काही स्थानिक आणि गुंड लोक करत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!