सोलापूर : प्रतिनिधी
मंगळवेढा येथील पत्नी नांदायला येत नसल्याचा राग मनात धरून पत्नीची धारदार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना परिसरात घडली. यात मयत महिलेचा भाऊ आणि आई जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नुराणी मस्जिद शेजारी राहणाऱ्या चौगुले कुटुंबातील मुलगी आरती हिचा पती अमोल ढेकळे-पाटील (रा. देगाव ता.मंगळवेढा) आपल्या आई वडिलांसोबत त्याच्या सासरी आला होता. यावेळी सासरच्या लोकांसोबत त्याचा वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने त्याने मारहाण करीत पत्नी आरती हिला चाकूने भोसकून हत्या केली.
यावेळी मयत आरती हिचा भाऊ प्रसाद चौगुले याच्यावर देखील आरोपी अमोल याने चाकूने जीवघेणा वार केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच आई बायडबाई हिला देखील जखमी केले. आरती हिचे वडील आबा चौगुले हे मुंबईत राहत असून या घटनेची खबर त्यांना देण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे दाखल झाले. दरम्यान, रात्री उशिरा पर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.