ध्यास विश्वसार्ह बातमीचा

….त्या दिवशी गिरीश महाजन पक्ष बदलणार ; संजय राऊतांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. भाजप हा पक्ष एकेकाळी हिंदुत्त्ववादी आणि सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता. आता या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत? दलाल, भ्रष्ट लोकांकडे. यांच्या हातात पोलीस, पैसे आहेत. त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. त्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत, त्यातील एक म्हणजे गिरीश महाजन आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही बोलावं वाटत नाही, ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, असा खळबळजनक दावा उद्धवसेनेचे प्रवक्ते तथा खा. संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपाचे नेते व मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी उद्धवसेनेवर टीका करताना, आगामी काळात हा पक्ष जमीनदोस्त होणार आहे, असा दावा केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्या आर्थिक घोटाळे आणि इतर भानगडींच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हा महाजन निरोप पाठवत होते की, मी राजकारणातून बाहेर पडतो आणि शांत बसतो, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाची वेळ येते आणि आमचीही वेळ येणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा वापरत आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने चड्डीची नाडी बांधायला शिकवली. राजकारणामध्ये तुम्ही कोण होतात, आमचे काही निर्लज्ज लोक महाजन यांच्या बाजूला थांबून फोटो काढत होते. गिरीश महाजन हे जे बोलतायेत ही भाषा त्यांना आणि पक्षाला घेऊन बुडणार आहे, असे देखील राऊत यांनी सुनावले. शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत अनेकजण शिवसेनेतून बाहेर पडले आणि मग त्यांनी सेना संपवण्याची भाषा केली. अमित शहांनी तर शिवसेना संपवण्यासाठी जंग जंग पछडले, त्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. ज्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे, त्यांचे गिरीश महाजन हे हस्तक असून ते मराठी द्रोही आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!