---Advertisement---

राज्यातील १३ जिल्ह्यात पावसासह वादळी वारे आणि मेघगर्जनेचा इशारा !

By team
On: June 9, 2025 9:58 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी, पुढील ४८ तास राज्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, ९ आणि १० जून रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पावसासह वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे १३ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे. विशेषतः पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना ठेवाव्यात.

विदर्भात पावसाची चाहूल लागण्याआधी नागपूरसारख्या शहरांमध्ये उष्णतेचा कहर कायम आहे. सध्या तापमान ४३ अंशांवर पोहोचले असून, उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १२ जूननंतर मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस तुरळक पावसासह उष्णता कायम राहण्याचा अंदाज आहे.

कोकणातल्या रत्नागिरीत रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु असून, विजांच्या कडकडाटात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून, रस्तेही जलमय झाले आहेत. मात्र, या पावसामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला आहे. पेरणी झालेल्या कोवळ्या भात रोपांना या पावसाचे मोठे आधार मिळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!