---Advertisement---

मंत्री बावनकुळे यांची भाषा दादागिरीची होती ; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी !

By team
On: June 12, 2025 4:59 PM
Follow Us:
---Advertisement---

अमरावती : वृत्तसंस्था

राज्यातील अमरावती जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या या उपोषणाने राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले आहे. बच्चू कडू यांना महसूल मंत्री बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर अली आहे. परंतु बावनकुळे यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर कडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी वापरलेल्या भाषेवर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, सरकारने सरकारचे काम करावे, आम्ही आमचे काम करू. शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत काम करत राहू. बावनकुळे यांच्याशी बोललो. कॉल रेकॉर्ड असता तर दाखवले असते ते कसे बोलले. ते म्हणाले की जमत असेल तर उपोषण सोडा, नाहीतर राहू द्या. ही भाषा आहे का? असे म्हणत बच्चू कडू यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, बावनकुळे आमच्या भेटीला येऊ शकले नाही त्याच दुःख नाही. पण फोनवर बोलतानाचा त्यांचा भाव बरोबर नव्हता. बावनकुळे यांची फोनवर भाषा दादागिरी आणि दमदामटीची होती. ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते. सत्तेतील मस्ती त्यांनी दाखवू नये. लाडक्या बहिणीच्या वेळी बैठका नाही घेतल्या. आता महिलांना अपात्र करता. तेव्हा निकष लावले नाही. आता आम्हाला निकष सांगता. आधी का बैठकी घेतल्या नाही. बावनकुळे यांच्या भावना काळजीच्या नव्हत्या. ते माझे मित्र आहे. पण अस बोलतील असे अपेक्षित नव्हते.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांनी केलेल सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बावनकुळे म्हणाले, कडू यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. मी आदरपूर्वक बोललो आहे. त्यांना विनंती केली की मुंबईमध्ये बैठक लाऊ. मी त्यांची विचारपूस करण्यासाठी पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. वेगवेगळ्या विभागाचे प्रश्न बच्चू कडू यांनी मांडले आहेत. त्यांनी चुकीच्या पद्धतीने बोलवू नये. आंदोलनाला बसलेल्या व्यक्तींची काळजी घेऊ. तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलून तातडीने बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!