ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काही लोकांमुळे सहकार क्षेत्र बदनाम झालंय तर खा.प्रणिती शिंदेंच्या टीकेला मंत्री गोरेंचे उत्तर !

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्यावर सत्ताधारी गटाकडून आरोप प्रत्यारोप करीत असताना आता महायुतीचे मंत्र्यांनी देखील शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे. सहकार क्षेत्राने शेतकऱ्यांना समृद्ध केले असले, तरी काहींनी कारखानदारीला कुटुंब चालवण्याचे साधन बनवल्याने सहकार चळवळ बदनाम झाली आहे, अशी टीका ग्रामविकास व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर आत्मपरीक्षणाची जबाबदारी सोपवताना त्यांनी पवार कुटुंबावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.

सहकाराने अनेक पिढ्या घडवल्या, शेतकऱ्यांना ताकद दिली, पण काही लोकांनी कारखाने आणि बँकांचा गैरवापर केल्याने ही चळवळ बदनाम झाली, असे गोरे म्हणाले. डीसीसी बँक आणि राज्य बँकेचे उदाहरण देत ते म्हणाले, “प्रशासक नियुक्त झाल्यावर डीसीसी बँक व्यवस्थित चालू लागली, तर तोट्यातील राज्य बँक नफ्यात आली.

याचे आत्मपरीक्षण व्हायला हवे.” सहकारात बाहेरच्या माणसाला सामावून घेतले जात नाही, पण काहींनी एकाचे दोन, दोनाचे चार कारखाने उभे केले, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. सहकारावरील शंका दूर करण्याची जबाबदारी सहकारमंत्र्यांची असल्याचेही ते म्हणाले.

जयकुमार गोरे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत सांगितले, “मी एका छोट्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. खासदार-आमदाराच्या घरात जन्म घेतला असता, तर हा संघर्ष वाट्याला आला नसता. पण संस्थानिक साम्राज्य असताना मी चार वेळा आमदार झालो.” अभिमन्यूला चक्रव्यूह तोडता आले, पण बाहेर पडता आले नाही.

मला मात्र गुरूंनी सर्व चक्रव्यूह तोडण्याचे मार्ग शिकवले, असे म्हणत त्यांनी आपल्या राजकीय ताकदीचा दावा केला. सोलापूरकरांनी दिलेल्या प्रेमाचा आणि विठुरायाच्या वारीच्या नियोजनाची जबाबदारी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर-गोवा विमानसेवेवरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेला गोरे यांनी प्रत्युत्तर दिले. “गोव्यातून पिढी बिघडते, तस्करी होते, असे म्हणणारे स्वतः गोव्यात गेले तेव्हा बिघडले का? गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र आहे. सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाली असून, लवकरच पुणे-मुंबई कनेक्टिव्हिटीही वाढेल,” असे ते म्हणाले.

गोरे यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना लोकांच्या मनातील शंका दूर करण्याचे आव्हान देताना, सहकार क्षेत्रातील बेबंदशाही थांबवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्या या टीकेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पवार कुटुंबावरील अप्रत्यक्ष हल्ल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!