अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट नगरी श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेली नगरी आहे.या नगरीत अनेक वर्षानंतर भव्य दिव्य बस स्थानक उभारले जात आहे.या पवित्र भूमीत पाऊलवाट तर सोडा, एक इंच जमीनही जिहादी वृत्तीच्या लोकांना देऊ दिली जाणार नाही. हे संपूर्ण प्रकरण आम्ही हाणून पाडू. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्ही कदापि
वाट सोडू देणार नाही,असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.लँड जिहाद, लव जिहाद आणि वोट जिहाद यांसारख्या प्रकारांना तर यापुढे थाराच दिला जाणार नाही,असेही त्यांनी सांगितले.
गुरुवारी,अक्कलकोट येथे बस स्थानकातील दक्षिण बाजूची पाऊलवाट सोडण्याच्या मागणीविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी सहभाग घेतला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दिला. मोर्चानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ झालेल्या सभेत विविध मान्यवरांनी ठाम भूमिका मांडली.पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले,
आमदार सचिन कल्याणशेट्टी हे हिंदुत्ववादी नेते आणि आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांचे ते अत्यंत विश्वासू आमदार आहेत.ते असा प्रकार होऊ देणार नाहीत याचा मला विश्वास आहे. अलीकडच्या काळात राज्यात धर्मांतराचे प्रकार वाढले आहेत म्हणून आम्ही धर्मांतरण विरोधी कायदा राज्यात लागू हो ण्यासाठी आग्रही आहोत. जे धर्मांतरित झाले आहेत, त्यांचे शासकीय लाभ बंद करण्यात यावेत, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर निर्णय घ्यावेत,अशी मागणी त्यांनी केली. आमदार संग्राम जगताप म्हणाले,
मोर्चा संपला म्हणजे काम संपले, असे समजू नका. अनेक देवस्थानांवर अतिक्रमण होत आहे. बेकायदेशीर गोष्टी करण्यासाठी पाऊलवाट मागणाऱ्यांची मागणी बेकायदेशीर आहे. ती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. छत्रपतींच्या विचारांना धरूनच सरकार चालले आहे.बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूला जे अतिक्रमण आहे.त्यावर देखील बुलडोझर फिरवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही आपल्या भाषणात ठाम भूमिका मांडली.अक्कलकोट ही स्वामी समर्थांची पवित्र भूमी आहे. या ठिकाणी राज्यभरातून लाखो भाविक येतात. त्यामुळे हे बस स्थानक चांगले आणि सुरक्षित व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. मात्र, या कामात अनेक अडथळे निर्माण करण्यात आले. आता पुन्हा पाऊलवाट सोडण्याची मागणी होत आहे, जी पूर्णतः बेकायदेशीर आहे. हे प्रकरण १९९८ पासून सुरू झाले आहे. त्यावेळी वाट सोडली नसती तर आज ही वेळ आली नसती. मुळात मागणी बेकायदेशीर असून मागील बाजूसही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. पर्यायी रस्ता असतानाही पाऊल वाटेसाठी अट्टाहास का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.हे आम्ही कदापि होऊ देणार नाही,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.आमदार देवेंद्र कोठे यांनीही आपल्या भाषणातून आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले, देव, देश आणि धर्म हेच आमचे मूल्य आहेत. आम्ही कधीही त्यांना धक्का लागू देणार नाही. आमदार कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा खर्च करून बस स्थानक उभे राहत असताना जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यात अडथळा निर्माण केला आहे. पर्यायी रस्ता असूनही ही मागणी पुढे का आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी लावून धरणार आहोत. शिवाय या बस स्थानकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी मांडली.अंबादास गोरटला यांनीही पाऊलवाटीची मागणी चुकीची असून ती कदापि सहन केली जाणार नाही,या ठिकाणी केवळ अवैध धंदे आणि अतिक्रमण करण्यासाठीच ही मागणी होत आहे,असे स्पष्ट केले. हिंदू धर्मावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. जिथे अन्याय तिथे आम्ही उभे राहू.या पाऊलवाटेमुळे बस स्थानकाची सुरक्षा धोक्यात येणार आहे, त्यामुळे वेळेत सावध होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.या सभेला श्री नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी,म. नि. प्र बसवलिंग महास्वामीजी यांचीही उपस्थिती होती. सभा सुरू होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सभेला शहर व तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदारकीपेक्षा धर्म महत्त्वाचा
विकासकामांमध्ये मी कधीही जातपात पाहत नाही. पण जेव्हा धर्माचा विषय येतो, तेव्हा मी नेहमी धर्माच्या बाजूने राहणार. यासाठी मला आमदारकी महत्त्वाची नाही. माझ्यासाठी देव, देश आणि धर्म यांनाच महत्त्व आहे. जिथे जिथे धर्माचा विषय असेल, तिथे मी अग्रभागी
असेन, अशी ठाम भूमिका आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या मोर्चामध्ये घेतली.