मोदी सरकारने अकरा वर्षात फाईव्ह सी च्या माध्यमातून काम केले
माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची माहिती
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकारने मागील अकरा वर्षांत सेवा, सुशासन आणि जनकल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशात ऐतिहासिक कामगिरी बजावली असून, २०४७ पर्यंत भारत हा विकसनशील देशांमधून विकसित देशांच्या यादीत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असेल, असा ठाम विश्वास भाजपाचे माजी संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट येथील कार्यालयात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात शहर व तालुक्यातील बुद्धिजीवी, अभियंते, पत्रकार, वकील, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘पाच सी’ या सूत्राद्वारे मोदी सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला.
पहिला ‘सी’ म्हणजे चेंज. या सरकारच्या काळात शेतकरी सन्मान निधी, डीबीटी, वन नेशन वन इलेक्शन, रस्ते विकास, गॅस योजना यांसारखे अनेक उपक्रम प्रभावीपणे राबवले गेले. दुसरा ‘सी’ म्हणजे कमिटमेंट. कलम ३७० हटवणे, स्वदेशी शस्त्रनिर्मिती सुरू करणे, आणि इतर अनेक वचनांची पूर्तता ही सरकारची बांधिलकी दर्शवते. तिसरा ‘सी’ म्हणजे करेज. पाकिस्तानवर ‘सिंधू ऑपरेशन’मधून ड्रोन हल्ले, कोविड काळातील प्रभावी निर्णय हे धाडसी पाऊल ठरले. चौथा ‘सी’ म्हणजे कम्युनिकेशन. ११८ कोटी जनतेपैकी ९७ टक्के लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले आहेत.
हे जाळे मागील अकरा वर्षात झपाट्याने विस्तारले आहे. पाचवा ‘सी’ म्हणजे क्रिएशन.संशोधन व नवनिर्मितीस चालना देणाऱ्या धोरणांमुळे देश अधिक स्वावलंबी झाला आहे. शस्त्रास्त्र उत्पादन, अभियंत्यांना संधी, आणि मौल्यवान ऐतिहासिक वस्तू परत मिळवण्यात सरकार यशस्वी झाले आहे.
जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले, या सरकारच्या काळात ७७ कोटींहून अधिक नागरिकांचे आयुष्यमान भारत अंतर्गत हेल्थ अकाउंट्स तयार करण्यात आले असून, ९ कोटींहून अधिक लोकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळाल्या आहेत. ग्रामीण भागात ३.९६ लाख किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले असून ९९ टक्के रस्ते जोडणी पूर्ण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात सुद्धा आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक विकासकामे सुरू आहेत म्हणून हे सरकार विकासाशी बांधील आणि कटिबद्ध आहे,
अशी माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमाची सुरुवात अंकुश चौगुले यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रास्ताविक अक्कलकोट शहर मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, माजी शहराध्यक्ष शिवशरण जोजन, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबू, मल्लिनाथ स्वामी, विकास वाघमारे, आप्पासाहेब पाटील, विलास गव्हाणे, दयानंद बिडवे, अॅड. विजय हर्डीकर, कांतु धनशेट्टी, विवेकानंद उंबरजे,वरुण शेळके,शकील नाईकवाडी,अयाज चंदनवाले,साहिलगौडा बागवान आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमानंतर कुलकर्णी यांनी शहर व तालुक्यातील अभियंते, पत्रकार, वकील आदींसोबत संवाद साधला.
विविध विकासकामांच्या पोस्टर्सचे उद्घाटन
अक्कलकोट भाजप कार्यालयात मोदी सरकारच्या अकरा वर्षांत झालेल्या यशस्वी योजनांचे पोस्टर्स लावण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन रघुनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या विकासकामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.