---Advertisement---

धाराशिवमध्ये जमीन संपादनाचा वाद : शेतकऱ्याला पोलिसांकडून जबर मारहाण

By team
On: June 23, 2025 10:18 AM
Follow Us:
---Advertisement---

धाराशिव : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस प्रशासनावर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांनी पवनचक्की प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कामाला विरोध करत काम अडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पवनचक्की व विद्युत लाइनसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला द्या अन्यथा काम थांबवा अशी भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पोलिस कोणासाठी काम करतात? सर्वसामान्य जनतेसाठी की पवनचक्की माफियांसाठी? असा सवाल कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर राजू शेट्टी यांनीही सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त केला.

राजू शेट्टी यांची पोस्ट काय?

अंबानींचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देवाभाऊ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) तुमचे पोलिसच जर गुंडांची भूमिका पार पडत असतील तर शेतकऱ्याने न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुय्कातील तांदळवाडी येथील गणेश शेरकर या शेतकऱ्याच्या जमिनीवर रिलायन्स रिन्यू पॅावर एनर्जीच्या टॅावर आणि वीजेची लाइन उभारण्याचे काम चालू आहे. शेरकर यांच्या क्षेत्रातून टॅावर व लाईन जात असल्याने त्याचा मोबदला रिलायन्स कंपनी देणार होती. अखेर मोबदला न देता टॅावर उभे केले. मात्र सदर टॅावरवर लाईन (वीजेच्या तारा) टाकण्यास शेतकऱ्याने विरोध केला. यावेळी संबधित कंपनीने पोलिसांना पाचारण केले.

सदर शेतकऱ्यास मोबदला न देता कंपनीने दडपशाहीने कामास सुरुवात केली. शेतकऱ्याने काम अडवल्याने पोलिस उपविभागीय अधिकारी राठोड याने सदर शेतकऱ्यावर लाठीचार्ज केला. यामध्ये गणेश शेरकर, अजय चोरघोडे, राजू कवडे यांना पोलिसांनी मारहाण केली. त्या सर्वांना रात्री दीड वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात ठेवलं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यादरम्यान कंपनीने उभारलेल्या टॅावरवर वीजेच्या तारा जोडण्यात आल्या. रात्री उशिरा या शेतकऱ्यांना सोडण्यात आले. अजूनही या कंपनीने संबधित शेतकऱ्यास पैसे दिलेले नाहीत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!