दक्षिण तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी वर्गणीतून उभारला नागरिकांसाठी पावसाळी निवारा शेड….
किरण जमदाडे यांची संकल्पना
सोलापूर : नागनाथ विधाते
दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या संवेदनशीलतेचे पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.विविध कामासाठी तहसील कार्यालयात येणा-या उन्हाळयात जनतेची आणि शेतकरी ऊनापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप उभारला होता आता पावसाळ्यात पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी चक्क पत्र्याचे निवारा शेड उभारला आहे.त्यामुळे तहसीलदार जमदाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावर्षी अवकाळी पाऊस आणि त्यापाठोपाठ दाखल झालेला मान्सून यामुळे सर्वत्र चांगला पाऊस पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दक्षिण तहसील कार्यालयात शासकीय कामासाठी येणार्या अभ्यागत व नागरिक यांची संख्या मोठी आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडत असल्याचे लक्षात आल्यावर सर्वसामान्य लोकांना नेहमी प्रथम प्राधान्य देणारे अधिकारी अशी जनमानसात ओळख असणारे तहसीलदार किरण जमदाडे यांनी कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत अभ्यागत व नागरिकांसाठी पावसापासून बचावासाठी कायमस्वरूपी चांगले निवारा शेड उभारण्याची संकल्पना त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचेसमोर मांडली.
दक्षिण तहसील कार्यालयात कार्यरत सर्व कार्यालयीन कर्मचारी व मंडल अधिकारी व तलाठी यांनी एकत्रितपणे वर्गणी गोळा केली. या एकत्रित केलेल्या वर्गणीतून चांगल्या दर्जाचे पत्रे व लोखंडी अँगलच्या सहाय्याने कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला निवारा शेड दोन दिवसांत उभे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत यापुर्वीच तहसील
कार्यालयात येणार्या नागरिकांना सावलीसाठी मंडप, अभ्यागत कक्षात अंथरलेला गालिचा आणि आरामदायी व पुरेशी बैठकव्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याच्या पाण्यासाठी नामांकित कंपनीचे वॉटर प्युरिफायर, मोबाईल चार्जिंगची सुविधा, वाचनासाठी दैनंदिन वृत्तपत्रे ,मासिके व पुस्तके तसेच वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी अँग्लोनेमा, डायफेनबाचीया ,मनीप्लांट व इतर अनेक रोपे यांनी कार्यालय परिसर सुशोभित करण्यात आला आहे.
तहसील कार्यालय व कार्यालयीन कर्मचारी यांच्या या निर्णयाचा ग्रामीण भागातून कामासाठी आलेल्या नागरिकांना पावसाळ्यात पडणार्या पावसापासून बचाव व्हावा यासाठी उभा केलेले निवारा शेड हे संवेदनाशीलतेचे एक वेगळे उदाहरण प्रस्थापित केल्याचे या निमित्ताने दिसून येत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
लोकांचे हाल पाहावले नाही आपण कामासाठी कार्यालयातून बाहेर जात असताना अचानक पाऊस सुरू झाला.यावेळी विविध कामांसाठी आलेल्या शेतकरी, महिला व नागरिक पावसापासून बचाव होण्यासाठी धावत कार्यालयात आली.ते भिजलेले होते.ऊन, पावसापासून नागरिकाचे संरक्षण व्हावे यासाठी कायमस्वरूपी मजबूत निवारा शेड उभारला आहे.जनतेची, शेतकरी बांधवांची सेवा आपल्या हातून घडो यासाठी आपले निरतंर प्रयत्न राहतील.
– किरण जमदाडे
तहसीलदार, दक्षिण सोलापूर