---Advertisement---

ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका सरकारने घेतला ; संजय राऊतांची टीका !

By team
On: June 30, 2025 10:55 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात हिंदी भाषेसंदर्भातील शासनाचे दोन्ही आदेश रद्द करण्याचा निर्णय रविवारी महायुती सरकारने घेतला. त्यानंतर विरोधकांनी एकच जल्लोष केला. आता सरकारने घेतलेल्या या माघारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका या सरकारने घेतला असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे तोडगे आणण्याचे प्रयत्न केले. पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली. महाराष्ट्रात त्या सरकारी अध्यदेशाची होळी झाली. काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक कॉंग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असेल रस्त्यावर उतरले आणि होळी केली. त्यानंतर सन्माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाचे सरकारने धसकाच घेतला होता. कारण महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते. या सगळ्याचा परिणाम झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अध्यादेश मागे घ्यावा लागला.

आता काहीतरी समिती स्थापन केली आहे. कशाला केली आहे? आम्ही त्रिभाषा सूत्री स्वीकारणारच नाही. महाराष्ट्र स्वीकारणार नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले आहे आणि राज ठाकरेंनीही सांगितले आहे. त्यामुळे उगीच आता समिती नेमण्याचा फालतू खेळ भाजपने करू नये. आता प्रश्न असा आहे की 5 तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित येणे हे महाराष्ट्रासाठी फार मोठे आकर्षण होते किंवा ताकद दाखवण्याचा मार्ग होता आणि त्यामुळेच अध्यादेश रद्द केला.

आता जी फोर्स तयार होणार होती 5 तारखेच्या मोर्चासाठी आता त्याचे काय करायचे तर मोर्चाचे रूपांतर विजयी सभेत करायचे आहे. माझे काल राज ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. आमची चर्चा झाली आहे. आता ते त्यांचे मत देतील. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितले होते की विजय मेळावा होईल. जे जे घटक मोर्चात सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह विजय मेळावा असेल. कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे यांनी जी साद घातली होती एकत्र येण्यासाठी, त्यावर उद्धव ठाकरे यांनी पुढील दहा मिनिटांतच त्याला प्रतिसाद दिला होता. त्यामुळेच आम्ही हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आलो. सकारात्मक नसतो तर एकत्र आलो असतो का? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. मराठीच्या प्रत्येक लढ्यात आम्ही एकत्र असूत. आमची भूमिका स्पष्ट आहे मुंबईसह महाराष्ट्र काबिज करणे.

माशेकलर समितीने जो अहवाल सादर केला होता त्यात हिंदी भाषेचा निर्णय हा उद्धव ठाकरेंनीच घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ते खोटे बोलत आहेत. माशेलकर अहवाल काय आहे हा टेबलवर ठेवावा. तुम्ही तरी नरेंद्र जाधव समिती का तयार करत आहात.

संजय राऊत म्हणाले, जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ येऊ शकतात, तर दोन भाऊ येण्यात तुमच्या पोटात का दुखत आहे. ठाकरे बंधू एकत्र येतात तुम्ही अस्वस्थ होत आहात. तुम्हाला वैफल्य येत आहे. फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते. नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचा हस्तक म्हणत होते. आता आम्हाला भूतकाळात जाऊ देऊ नका.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!