---Advertisement---

आता इंडिया आघाडी-महाविकास आघाडीची गरज नाही ; संजय राऊत !

By team
On: July 10, 2025 10:59 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे.

नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते, त्याचवेळी मी एक रोखठोक सदर लिहिले होते. त्याचवेळी संघ मुख्यालयात काय चर्चा झाली याचा सारांश मी त्यात लिहिला होता. नरेंद्र मोदी किंवा संघाने जो नियम केला होता की, 75 वर्षे झाल्यानंतर सत्तेच्या पदावरून निवृत्ती घ्यावी. नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा अशा अनेक नेत्यांना आपल्या स्वार्थासाठी जबरदस्तीने निवृत्ती घ्यायला लावली.

 

आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे. त्यांच्या डोक्यावरचे केस देखील उडालेले आहेत. त्यांचे जगभ्रमण करून झालेले आहे. सत्तेचे सर्व सुख त्यांनी भोगलेले आहेत. आता जो नियम त्यांनीच केलेला आहे, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना वारंवार निवृत्त होण्याची सूचना देत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

निवृत्तीनंतर कोणी काय करायचे? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अनेक चांगल्या गोष्टी निवृत्तीनंतर करता येतात. जसे संघाचे नेते नानाजी देशमुख यांनी चित्रकूट येथे उत्तम प्रकारचे कार्य केले आहे. अनेक जण सामाजिक आणि इतर कार्य करत असतात. त्यावर चर्चा करण्याचे काही कारण नाही. या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत, हे देशासाठी शुभ संकेत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अमित शहा यांनी दिलेल्या निवृत्तीच्या संकेता वरुन संजय राऊत यांनी असे खोचक वक्तव्य केले आहे.

मनसे आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार आहेत, असे मी म्हणालो नाही. मात्र त्यासाठी लोकांचा दबाव असल्याचे मी म्हणालो होतो. शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन, एकत्र निवडणूक लढवावी यासाठी लोकांचा प्रचंड दबाव आहे. पाच तारखेला विजयी मेळावा झाला, त्या मेळाव्यात देखील ते दिसून आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जर मुंबईमध्ये मराठी माणसे वाचवायची असेल, मुंबईला वाचवायचे असेल, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊन निवडणुका लढवाव्या लागतील, अशी लोकांची मानसिकता असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

 

इंडिया आघाडी लोकसभेसाठी बनली होती. तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी बनली होती. या दोघांची आवश्यकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक विषय असतात. काही शहरांचे विषय असतात, स्थानिक मुद्दे असतात. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निर्णयावर विचार करावा लागेल. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढवाव्यात यासाठी लोकांचा प्रचंड दबाव असल्याचा दावा त्यांनी केला.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!