ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात खळबळ : दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेत्याला अटक !

पंढरपूर : वृत्तसंस्था

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका तथाकथित कामगार नेत्याने कारखान्याचे चेअरमन यांच्याकडे 1 कोटीची मागणी केली होती. यातील पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपयांची खंडणी दि. 10 जुलै रोजी रात्री घेताना कामगार नेत्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. किरण पुरुषोत्तम घोडके (वय 27, रा. अनवली) असे या कामगार नेत्याचे नाव आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई पंढरपूर-पुणे रोडवरील पंढरपूर शहरातील हॉटेल राधेश येथे घडली. याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे ता. पंढरपूरचे चेअरमन आहेत. या कारखान्याच्या कामगारांच्या थकीत वेतन संदर्भात किरण घोडके याने या अगोदर आंदोलन केले होते. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर विठ्ठल कारखान्याच्या कामगारांचे आंदोलन सुरू होते.

यामध्ये किरण घोडके यामध्ये सहभागी झाला होता. याच दरम्यान घोडके याने आपण कारखान्याची व आमदार अभिजित पाटील यांची बदनामी न करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये द्या, अशी मागणी फिर्यादी आमदारांचे सहकारी नितीन रघुनाथ सरडे (रा. देगाव) यांच्याकडे केली होती. त्यानुसार गुरुवार, दि. 10 रोजी सायंकाळी राधेश हॉटेलमध्ये खंडणी म्हणून 10 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी घोडके याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घोडके यांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या घटनेत आणखी कोणी आहे का? किंवा अन्य तपशीलांचा अधिक तपास पंढरपूर शहर पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!