---Advertisement---

‘दोपहरचा सामना’ बंद करावा ; ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची मागणी !

By team
On: July 13, 2025 5:12 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी-हिंदी वाद सुरु असून आता ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठी मागणी केली आहे. हिंदी भाषेचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरे यांनी ‘दोपहरचा सामना’ बंद करावा, अशी मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. हिंदी भाषा शिकवण्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला त्यांनी विरोध केला आहे. राज्यामध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी लागू करण्यात यावी. यासाठी तसेच ठाकरे बंधूंच्या विरोधात आपण पुढच्या आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे देखील सदावर्ते यांनी सांगितले आहे.

या संदर्भात बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, देशाला तोडणाऱ्यांनी राज्यात दोन कोटी हिंदी भाषिक असल्याचे लक्षात ठेवावे. सात कोटी बहुभाषिक होण्यास इच्छुक आहेत तर दोन कोटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सारखे आहेत. मालदीव मध्ये देखील हिंदी भाषा अनिवार्य असल्याचे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे राज ठाकरे यांनी विचारलेला प्रश्नाला पूर्णविराम मिळत असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. राज्यामध्ये तिसरी भाषा अनिवार्य केलीच पाहिजे, त्यामुळे राज्य सरकारने शासन निर्णय पुन्हा लागू करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

भाषेच्या नावावर कापाकापी करणाऱ्यांना घरात बसवा

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंदी भाषा सेलचे राज्यप्रमुख पारसनाथ तिवारी यांनी आज गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेतली. यावेळी सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. देशातील चळवळी या विचारांवर उभ्या आहेत. देशाची भाषा हिंदी आहे. मात्र भाषेच्या नावावर कापाकापी करू नये, असे करणाऱ्यांना घरात बसवा, असे देखील सदावर्ते यांनी म्हटले आहे.

ठाकरे बंधू विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा

राज्य सरकारच्या वतीने त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून राज्यांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला ठाकरे बंधूंनी विरोध केला. या विरोधात त्यांनी पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र त्या आधीच शासनाने निर्णय मागे घेतला. त्यामुळे हा मोर्चा देखील रद्द करण्यात आला. त्याऐवजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत पाच जुलै रोजी विजयी मेळावा घेतला होता. या मेळाव्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधू विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!