ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना फुटल्याची खंत असून, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी आशा असल्याचे ते म्हणालेत. शिवसेना म्हणून आपण एकत्र असले पाहिजे, शिवसेनेची एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित येण्याची अपेक्षा अंबादास दानवे यांनी केली.

अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. दानवेंच्या निरोप समारंभाच्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची एकमेकांवरील टोलेबाजी पाहायला मिळाली. तसेच अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या फोटोसेशन वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांकडे पाहणे टाळले होते आणि बाजूला बसणे देखील टाळले होते. आता अंबादास दानवेंच्या उपरोक्त विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अंबादास दानवे यांनी ‘एबीपी माझा’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, “मी तेवढा मोठा नाहीये. पण निश्चित मी त्यादिवशी सुरुवातीलाच म्हटले की, मनाला वेदना झाल्या. जी संघटना अखंड ताकदवान होती, ठीक आहे, सत्तेत बसणे वगैरे, आम्ही काय सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता येईल आणि जाईल. पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना मनाला आणि हृदयाला झालेल्याच होत्या. या वेदना कधी ना कधी भरुन निघाव्यात असे मनाला वाटत असते.

अंबादास दानवे पुढे म्हणाले, सगळे एकत्र असले पाहिजे. सगळे लोकं असले पाहिजेत. कारण आपली शिवसेनेचे राज्य असले पाहिजे. आपली महाराष्ट्रात ताकद असली पाहिजे, असे मला शिवसैनिक म्हणून वाटतंच. आशा ठेवायला काही हरकत नाही.

“मी कुणाविषयी वैयक्तिक सल ठेवणार नाही. पण मनाला ही सल कायम आहे की, आपली एवढी मजबूत संघटना कुणीतरी फोडली. तिला कुणाची तरी दृष्ट लागली. संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच माझी इच्छा आहे”, असेही अंबादास दानवे म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!