ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मद्यधुंद तरुणाने केला मंत्री शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी

राज्यातील महायुती सरकारचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या येथील निवासस्थानी एका तरुणाने हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात दिव्य मराठी डिजिटलने मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ घुले असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हा तरुण रविवारी मध्यरात्री मंत्री संजय शिरसाट यांच्या येथील निवासस्थानालगत आला. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने त्याच स्थितीत शिरसाट यांच्या बंगल्याच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी त्याने शिवीगाळही केली. सदर तरुणाने हे कृत्य का केले? हे समजले नाही. पण त्याने हा प्रकार दारुच्या नशेत केला असावा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सदर तरुणास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

यापूर्वी गत नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत एका अज्ञात व्यक्तीने संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यात त्यांच्या गाडीची काच फुटली होती. मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना ही घटना घडली होती. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.

उल्लेखनीय बाब म्हणजे संजय शिरसाट सध्या एका व्हिडिओमुळे वादात सापडलेत. या व्हिडिओत ते आपल्या बेडरुममध्ये पलंगावर बनियनवर बसल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या शेजारी पैशाने भरलेली बॅगही दिसून येत आहे. या प्रकरणी विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर त्यांनी सदर बॅग पैशांची नव्हे तर कपड्यांची असल्याचा दावा केला. ते म्हणाले, तो व्हिडिओ माझ्या बेडरूममधीलच आहे. मी प्रवासातून आल्यानंतर बेडवर बसल्याचे दिसून येत आहे. तिथे माझा श्वान घुटमळत आहे. माझी कपड्यांची बॅगही तिथे आहे. त्याची बातमी होते. याचे मला आश्चर्य वाटते. आमच्याकडे मातोश्री व मातोश्री -2 नाही. माझे घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकासाठी उघडे असते. कार्यकर्ते येतात. उत्हासाच्या भरात त्यांच्यापैकी एखाद्याने हा व्हिडिओ काढला असेल. माझ्या घरात चिठ्ठी देऊन कुणालाही बोलावले जात नाही. काम काय, नाव काय, या गोष्टीही विचारल्या जात नाहीत. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवले आहे की, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता व्हायचा प्रयत्न करू नका. त्यानुसार, आजही आम्ही त्याच भूमिकेत आहोत, असे ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!