---Advertisement---

युद्धविराम करायला ट्रम्प कोण आहेत? राहुल गांधींचा हल्लाबोल !

By team
On: July 23, 2025 4:38 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान ट्रम्प यांच्या दाव्यावर काहीच बोलू शकत नाहीत. काय बोलतील?, की ट्रम्पने युद्ध थांबवलं? ते तसं सांगू शकत नाहीत, पण हीच खरी परिस्थिती आहे. जगभराला माहिती आहे की ट्रम्पने सीझफायर जाहीर केलं. आपण सत्यापासून पळ काढू शकत नाही.”

राहुल गांधी यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 25 वेळा या ‘सीझफायर’ चा उल्लेख केला असताना, मोदींनी यावर एकदाही उत्तर का दिलं नाही? “ज्यांना स्वतःला देशभक्त म्हणवून घ्यायचं आहे, ते सध्या कुठे आहेत? पंतप्रधान एकही वक्तव्य करू शकलेले नाहीत. ट्रम्प कोण आहेत? हा त्यांचा कामाचा विषयच नाही. पण तरीही मोदींनी कधीच प्रतिक्रिया दिली नाही. हीच खरी परिस्थिती आहे,” असं गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. “आपलं परराष्ट्र धोरण त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे. किती देशांनी आपल्या बाजूने उभं राहिलंय? मोजकंच समर्थन मिळालंय,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी यांनी असंही सांगितलं की ही फक्त सीझफायरची गोष्ट नाही. देशात अजूनही अनेक महत्त्वाचे विषय आहेत जसे की संरक्षण, संरक्षण उत्पादने आणि ऑपरेशन सिंदूर यावरही चर्चा व्हायला हवी. देशातील परिस्थिती चांगली नाही. संपूर्ण देशाला हे माहित आहे,” असं ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच एका वक्तव्यात पुन्हा दावा केला की त्यांनीच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवलं. “भारत आणि पाकिस्तान यांच्यात आण्विक युद्ध होऊ शकत होतं. त्यांनी एकमेकांची 5 विमाने पाडली होती. मी त्यांना सांगितलं – जर असं केलंत तर व्यापार संपवू आणि त्यांनी थांबवलं. मी युद्ध थांबवलं,” असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान, ट्रम्प यांनीच सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूरदरम्यान सीझफायरचे ट्विट केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने दोन्ही देशाच्या सैन्यांनी समन्वयाने युद्ध थांबवल्याचे सांगितले. पण त्यानंतरही ट्रम्प यांनी वारंवार सीझफायरचे श्रेय स्वतःकडेच घेतले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!