हिंगोली: वृत्तसंस्था
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता. २६ जुलै) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान खात्याने ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.
आज सकाळपासून जिल्ह्यात अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. सेनगाव तालुक्यातील भंडारी गावाजवळील ओढ्याला पूर आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पूरपरिस्थितीचा फटका हिवरखेडा, धोत्रा, भंडारी, होलगीरा येथील महाकाली विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींना बसला. त्या एस. टी. महामंडळाच्या बसने ये-जा करतात. मात्र, मुसळधार पावसामुळे बस रस्त्यात अडकली आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी, सुमारे नऊ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे.
काही शेतकरीही शेतात अडकले असून, मदतीसाठी प्रशासनाचे पथक कार्यरत आहे. पूर ओसरल्यानंतर विद्यार्थिनींना सुरक्षितरित्या घरी पाठवले जाणार आहे.