---Advertisement---

…त्यांचे सिंदूर तुम्हाला दिसत नाही का? बच्चू कडू यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल !

By team
On: July 29, 2025 4:54 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन महादेव’ राबवत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पार्श्वभूमीवर बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “धर्माच्या नावाखाली 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढली जाते, पण 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी त्यावर सरकार एक शब्द बोलायला तयार नाही,” अशी टीका त्यांनी केली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये, अमरनाथ यात्रेदरम्यान, ऑपरेशन महादेव अंतर्गत, सैन्याने पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांना ठार मारले. श्रीनगरमधील दाचीगामच्या वरच्या भागात झालेल्या भीषण चकमकीत मारले गेलेले तीन दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर उपरोक्त टीका करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

धर्माचे नाव देऊन 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढतात, मात्र 6 लाख शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत, त्याची चर्चाही करायला सरकार तयार नाही. त्यांना देवी-देवतांचे फक्त नाव वापरायचे आहे. लोकांना धर्मामध्ये गुंतून ठेवायचे आहे, पण तो महादेवाचा त्रिशूल शेतकऱ्याच्या छाताड्यात खूपसायचा अशी अवस्था आणली आहे, अशी जहरी टीका बच्चू कडू यांनी सरकारवर केली आहे.

“सहा लाख हिंदू मातांनी, बहिणींनी आपले सिंदूर गमावले, त्यावर पंतप्रधान मोदी किंवा मुख्यमंत्री फडणवीस एक शब्द बोलत नाहीत. श्रद्धांजली तरी द्यावी, एवढंही त्यांच्या मनात येत नाही. मात्र 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढली जाते. सहा लाख मरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तो सिंदूर कुठे गेला? त्यांचे सिंदूर तुम्हाला दिसत नाही का? असा सवाल करत याहून मोठे दुर्दैव काय?” असे बच्चू कडू म्हणाले.

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, “हा संपूर्ण खेळ भाजपचा आहे. सर्व घटक पक्षांवर दबाव ठेवण्याचे हे राजकारण आहे. नुकताच अमित शहांचा फोन उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी गेला. उद्धव ठाकरेंनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे सगळे नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांनी केंद्रात काही हालचाल करू नये, यासाठी अप्रत्यक्ष इशारा देण्याचा प्रयत्न आहे.”

“तुम हट गये, तो मेरे पास पवार आणि ठाकरे आहेत, असे सगळे सूचकपणे दाखवण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहे. याचा अर्थ असा नाही की, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार, पण त्याचा आभास निर्माण केला जातोय,” असेही बच्चू कडू म्हणाले.

भाजपकडून सध्या संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. जनतेला नेमके काय घडतंय हेच कळू नये, हा यामागचा उद्देश आहे. मित्र पक्षांवर दबाव आणून त्यांना नको त्या वाटेवर आणण्याचा हा डाव आहे, असा गंभीर आरोपही बच्चू कडू यांनी केला.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!