---Advertisement---

भरदिवसा तरुणीचे अपहरण; पोलिसांनी जीव वाचवला, एक अटकेत तर दुसरा फरार

By team
On: July 31, 2025 10:11 AM
Follow Us:
---Advertisement---

नांदेड : वृत्तसंस्था

शहरात भरदिवसा घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिला दुचाकीवर जबरदस्तीने बसवले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी घाबरून त्या तरुणीला रस्त्यावर फेकले आणि पळ काढला. ही घटना नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात घडली असून, तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत एक आरोपी ताब्यात घेतला आहे, तर दुसरा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. व्हिडिओमध्ये एक आरोपी मुलीला गळ्यातून धरून ओढत नेत असल्याचे दिसते, तर मुलगी जोरजोरात ओरडत असून प्रतिकार करत आहे. रस्त्यावर उपस्थित नागरिक फक्त व्हिडिओ काढताना दिसतात, मात्र एक जण “चला, मुलीला वाचवूया” असे म्हणतानाही ऐकू येतो.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पीडित मुलीला सुखरूप वाचवण्यात आले असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी तत्काळ पोहोचले होते, त्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की आरोपी आणि पीडित मुलीची पूर्वीपासून ओळख होती. त्यांच्यात काहीसा वाद झाल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पळून जाताना पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी आरोपींनी मुलीला रस्त्यावरच फेकले आणि दुचाकीवरून पसार झाले.

या घटनेमुळे नांदेडमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या, गर्दीच्या ठिकाणी अपहरणाचा प्रयत्न झाल्याने नागरिकांत चिंता वाढली आहे. स्थानिकांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली असून, दुसऱ्या आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!