---Advertisement---

मुंबईच्या गँगवॉरचा योद्धा आता विश्रांतीत

By team
On: August 1, 2025 10:53 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर धाक टाकणारे आणि ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलिस आयुक्त दया नायक यांनी अखेर वर्दीला अलविदा केला आहे. त्यांनी गुरुवारी आपल्या पोलिस सेवेतील 31 वर्षांचा थरारक प्रवास संपवून निवृत्ती स्वीकारली.

1995 मध्ये मुंबई पोलिस दलात दाखल झाल्यानंतर दया नायक यांनी गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नावावर तब्बल 86 एन्काउंटरची नोंद आहे, ज्यात दाऊद टोळीतील 22 आणि राजन टोळीतील 20 गुंडांचा समावेश आहे. त्याशिवाय, एलटीटीई आणि लष्कर-ए-तोयबासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंधित गुन्हेगारांनाही त्यांनी निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठार केले.

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी 1000 पेक्षा जास्त गुन्हेगारांना अटक केली, आणि कंदहार विमान अपहरण, 2006 चे मुंबई रेल्वे स्फोट, यांसारख्या प्रकरणांच्या तपासात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी गुन्हेगारीविरोधी कारवाईचा नवा मापदंड उभा केला.

दया नायक यांचा प्रवास केवळ शौर्याचा नव्हता, तर वादग्रस्तही होता. त्यांच्या कार्यशैलीवर टीका झाली, चौकशा झाल्या, परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस निर्दोष ठरत आपल्या कर्तृत्वाचा ठसा कायम ठेवला. निवृत्तीच्या दोन दिवस आधीच त्यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदाची बढती मिळाली – ही बाब त्यांच्या कारकीर्दीला दिलेली एक आदरांजलीच म्हणावी लागेल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!