---Advertisement---

धक्कादायक : यवतमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि धार्मिक स्थळी तणाव !

By team
On: August 1, 2025 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे शुक्रवारी सकाळपासून तणावाचे ढग दाटले. दोन गटांमध्ये तुफान वाद झाला, दगडफेक झाली आणि काही ठिकाणी वाहनांची तोडफोड व धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा प्रयत्नदेखील झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असला, तरी गावात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.

ही घटना यवतमधील सहकार नगर भागातील एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट केल्यानंतर सुरू झाली. पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि दोन समुदायांमध्ये संताप उसळला. दुपारी १२ वाजता गावातील आठवडी बाजार बंद करण्यात आला. त्यानंतर जमावाने काही दुचाकी जाळल्याचा आरोप करण्यात आला, तर एका धार्मिक स्थळीही दगडफेक झाली.

घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. यवतमध्ये अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. “गावात सध्या नियंत्रण आहे, मात्र पेट्रोलिंग सुरूच राहील,” असे पोलीस अधिक्षक संदीप गिल यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ताजी असली तरी यवतमधील जातीय तणावाला मागील आठवड्याच्या एका घटनेची पार्श्वभूमी आहे. २६ जुलै रोजी नीळकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या कथित अवमानाची घटना घडली होती. त्या प्रकरणाने तणाव निर्माण झाला होता, तो निवळतो न निवळतोच ही नवी आग भडकली.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्च्यामुळे गावात वातावरण अधिक तापलं. त्याचाच परिणाम म्हणून आजची घटना घडल्याचा आरोप काहींनी केला आहे. दौंडचे आमदार राहुल कूल यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व गटांशी संवाद सुरू असल्याचे सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!