ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दहशतवाद्यांविरोधात कारवाई : कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, ऑपरेशन सुरूच

श्रीनगर : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील देवसर येथील अखल वनक्षेत्रात सुरक्षा दलांनी TRF (The Resistance Front) दहशतवादी संघटनेशी संबंधित अतिरेक्यांविरोधात मोठी मोहीम राबवली. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला असून, इतर लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात संयुक्त ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.

गुप्त माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी या वनक्षेत्रात काही दहशतवादी लपल्याचे लक्षात येताच भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष गट आणि CRPF यांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. शोधकार्य सुरू होताच दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनीही जोरदार कारवाई केली. काही वेळ गोळीबार सुरू राहिल्यानंतर अंधाराचा फायदा घेत काही दहशतवादी जंगलात पसार होण्यात यशस्वी झाले.

संपूर्ण भागाची नाकेबंदी करून रात्रभर कडक पहारा ठेवण्यात आला. शनिवारी सकाळपासून शोधमोहीम पुन्हा सुरू झाली आणि त्यादरम्यान एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने याबाबत माहिती देत ऑपरेशन अजून सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तोयबाच्या TRF या गटाशी संबंधित आहेत आणि ते अलीकडेच झालेल्या पहलगाम हल्ल्यात सहभागी होते, असा संशय आहे. त्यामुळे ही कारवाई सुरक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जवळच्या जंगल व डोंगराळ भागातही शोध सुरू असून, उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. संपूर्ण मोहिमेत उच्च सतर्कता पाळली जात असून, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन सुरक्षा दलांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!