---Advertisement---

मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा अपघात !

By team
On: August 3, 2025 5:59 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आज लिफ्ट अपघातातून थोडक्यात बचावले. बीड दौऱ्यावर असताना ही घटना घडली. बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या भेटीसाठी आले असताना, त्यांच्यासह काही सहकारी लिफ्टमधून खाली उतरत होते. याचवेळी लिफ्टने अचानक नियंत्रण गमावले आणि पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे आज बीड दौऱ्यावर आहेत. शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते आले होते. भेट झाल्यानंतर पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर येण्यासाठी ते लिफ्टमध्ये बसले. त्यावेळी, अचानक लिफ्ट बिघडल्याने अपघाताची घटना घडली. वरच्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर येऊन आदळली. लिफ्टचा मोठा आवाज झाल्याने आसपासच्या लोकांनी तातडीने तळमजल्याकडे धाव घेतली. लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे, अनेकांचा जीव भांड्या पडला.

जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत. बीड, जालना, अहमदनगर, धाराशिवसह विविध ठिकाणी कार्यक्रमांना ते उपस्थित राहत आहेत. लवकरच ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. “आरक्षण मिळाल्याशिवाय परतीचा मार्ग नाही,” असा निर्धार मनोज जरांगे यांनी यापूर्वीच केला आहे. यापूर्वी त्यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण करून राज्य सरकारला दबावात आणले होते. त्यानंतर सरकारकडून आश्वासन मिळाल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले. परंतु आता पुन्हा ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी अधिक ठामपणे मैदानात उतरले असून, मराठा समाजासाठी निर्णायक लढा देण्याचा त्यांचा निर्धार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!