---Advertisement---

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ; मंत्र्यांनी व्यक्त केली भावना !

By team
On: August 5, 2025 10:42 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगली : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी भावना व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे आयोजित एका युवा संवाद मेळाव्यात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही, असे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.

मंत्री मुश्रीफ आपल्या भाषणात म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस ही एकमेव असा पक्ष आहे, जो युतीत असूनही छत्रपती, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडत नाही. जिथे जमेल तिथे युती, जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर, हे पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची रणनीती असेल,” असे यावेळी त्यांनी आगामी निवडणूकांबाबत देखील स्पष्ट केले.

युवा संवाद मेळाव्यात बोलताना मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा मंत्र दिला. त्यांनी म्हटले की, “भविष्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, हे स्वप्न बघतो. अजित पवार आता मुख्यमंत्री होऊपर्यंत आता शांत बसायाच नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये युतीचा झेंडा कसा लागेल आणि त्यामध्येही राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेल, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे. कार्यकर्त्यांना एकजुटीने आणि जोमाने कामाला करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी देखील अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची इच्छा आहेच, पण एवढ्यावरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचीही हीच भावना आहे,” असे  स्पष्ट विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले होते.
यानंतर आता मुश्रीफ यांनी देखील अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतचे विधान केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!