मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतांची चोरी, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि भाजपवर पक्षपाती वर्तनाचे आरोप करत शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचेही त्यांनी समर्थन केले आहे.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काही व्यक्तींनी त्यांना भेटून “१६० जागा जिंकून देण्याचा” प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट केला. या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शरद पवार साहेबांचा अनुभव खूप मोठा आहे. ते अनेक वर्षे राजकारणात असून त्यांनी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं, ते असंभाव्य वाटत नाही. अशा प्रकारचे प्रस्ताव येऊ शकतात, हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं असेल.
मतांची चोरी यावेळी उघडपणे झाली असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, आता सर्वसामान्य जनतेलाही हे समजू लागले आहे की निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यालयातून चालते. आम्ही निवडणूक आयोगावर टीका केली, की भाजपला ती झोंबते. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, मतांची चोरी झाली की नाही, यासाठी कुठलाही खुलासा गरजेचा नाही, कारण राहुल गांधींनी नुकतेच काय खरे आणि काय खोटे हे सर्व पुराव्यानिशी समोर आणले आहे.
दरम्यान, मुंबईतील वरळी परिसरात नारळी पौर्णिमेच्या दिवशी आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठाजवळ पोहोचले असता त्यांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळला. काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, काल कोळिवाड्यात सण होता आणि आम्ही तो साजरा करण्यासाठी गेलो होतो. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला धक्काबुक्की केली जात होती. आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न करत होतो, कारण आज सरकार त्यांचं आहे आणि ते आमच्यावर कोणताही खोटा गुन्हा दाखल करू शकतात. त्यांनी आधीही आम्हाला ‘अर्बन नक्षल’ म्हटले आहे.
घटनेच्या वेळी घटनास्थळी चार ते पाच कॅमेरे होते आणि सर्व गोष्टी त्यात रेकॉर्ड झाल्या आहेत. आम्ही कोणताही गोंधळ न करता वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही जर एवढीच भीती होती, तर शिंदे वरळीत आलेच का, असा थेट सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांचं हे नेहमीचं रडगाणं असून, त्यांनी अशा प्रकारच्या राजकारणाला आता पूर्णविराम द्यावा, असेही ते म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणामुळे निवडणूकपूर्व वातावरण अधिकच तापले असून, राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.