---Advertisement---

तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू ; भाजपचा पलटवार !

By team
On: August 11, 2025 5:05 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून भाजपने देवेंद्र फडणवीस हे चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. या प्रकरणी या भगव्या पक्षाने ठाकरेंवरच खंडणीखोरांचे सरदार असल्याचा पलटवार केला आहे. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती. जनता हे विसरली नाही. त्यामुळे फडणवीसांवर टीका करताना आपला भूतकाळ आठवा, असे भाजपने ठाकरेंवर पलटवार करताना म्हटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून महायुती सरकारवर घणाघात केला होता. तसेच कथित मतचोरीचा दाखला देत देवेंद्र फडणवीस हे चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर असल्याचाही आरोप केला होता. त्यांची ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. राज्याचे महसूल मंत्री तथा ज्येष्ठ भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार केला. तसेच फडणवीसांवर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतःला आरशात पहावे असा टोलाही हाणला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे, खंडणीखोरांचा सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चीफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘थीफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. वाझे काय लादेन आहे का? असे म्हणत उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती हे जनता विसरली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरा आपला भूतकाळ आठवा आणि विचार करून बोला.

बाकी इंडी आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्राने बघितली. आजही आपल्याला शेवटच्या रांगेत उभे राहावे लागेल म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेला नाहीत आणि इथे चार टाळके घेऊन आंदोलन केले. तिकडे राहुल गांधींचे आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता. आज देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रामाणिक नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला आरशात पाहायला हवे. देवेंद्र फडणवीस यांचे काम हे फक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचे नाही, तर स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे आहे. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्र यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. याऊलट तुम्हाला लोकं कंटाळले आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!