ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खळबळजनक : दुहेरी हत्याकांडाने भिवंडी हादरली : एक भाजपचा पदाधिकारी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील भिवंडी शहरात धारदार शस्त्राने दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे सहकारी तेजस तांगडी यांचा मृत्यू झाला आहे. चार ते पाच अज्ञातांनी ही हत्या केल्याची माहिती मिळत आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा खारबाव-चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे घडली असून, या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल तांगडी हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसोबत जेडीटी इंटरप्रायझेस या कार्यालयात बसले असताना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. या दुहेरी हत्येमुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.

विशेष म्हणजे, यापूर्वीही सुमारे एक वर्षांपूर्वी प्रफुल्ल तांगडी यांच्यावर अशाच प्रकारे जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र तेव्हा ते थोडक्यात वाचले होते. मात्र, काल रात्री झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ही हत्या पूर्वनियोजित असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!