---Advertisement---

महायुतीत वादाची ठिणगी : “‘जनाची नाही तर मनाची ठेवा’” भाजप नेत्याचा टोमणा !

By team
On: August 12, 2025 2:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुतीचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धाराशिव येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. साखर कारखान्यांच्या इथेनॉल धोरणावर बोलताना विखे पाटील यांनी अजित पवारांना “‘जनाची नाही तर मनाची ठेवा’” असा टोमणा मारला, तर शरद पवार यांना “जाणता राजा” म्हणत त्यांनी “लोकांच्या घरात फोडाफोडी करून महाराष्ट्र उपाशी ठेवला” असा गंभीर आरोप केला. या वक्तवाने महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

विखे पाटील यांनी धाराशिव येथे शेतकऱ्यांना संबोधित करताना साखर कारखान्यांच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इथेनॉल धोरणाला दिलं. मात्र, साखर संघाच्या सभेत आणि अहवालात या नेत्यांचे फोटो किंवा अभिनंदनाचा ठराव नसल्याबद्दल त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

“ज्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखानदारीला जीवनदान दिलं, त्यांचे फोटो बॅनरवर लावले जात नाहीत, किंवा सभेत त्यांचं अभिनंदन केलं जात नाही. अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी,” असं विखे पाटील यांनी तिखट शब्दांत सुनावलं. यावेळी त्यांनी अजित पवार त्या काळात मंत्रिमंडळात नव्हते, असंही नमूद केलं.

शरद पवार यांना “जाणता राजा” म्हणत विखे पाटील यांनी त्यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. “शरद पवार यांनी फोडाफोडीचं राजकारण करत लोकांची घरं फोडली आणि महाराष्ट्राला उपाशी ठेवण्याचं पाप केलं,” असा थेट आरोप त्यांनी केला. साखर कारखान्यांच्या धोरणावर बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकारी चळवळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

विखे पाटील यांनी साखर कारखानदारीच्या प्रगतीचं श्रेय केंद्र सरकारच्या धोरणांना देताना, शरद पवार यांच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. दरम्यान, विखे पाटील यांच्या या वक्तवाने महायुतीतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

यापूर्वीही विखे पाटील आणि अजित पवार यांच्यात दूध अनुदानाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळात खटके उडाले होते. २३ सप्टेंबर २०२४ रोजी दूध उत्पादकांना ५ ऐवजी ७ रुपये अनुदान देण्याच्या मुद्द्यावर दोघांमध्ये तू-तू, मैं-मैं झालं होतं. आता पुन्हा विखे पाटील यांच्या या टोमण्याने अजित पवार गट आणि भाजपमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांचा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे, आणि यावरून होणारा वाद महायुतीच्या एकजुटीवर परिणाम करू शकतो.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!