---Advertisement---

पोलिसांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी बॉम्बस्फोटाचा कट उधळला ; ६ जणांना ठोकल्या बेड्या !

By team
On: August 12, 2025 4:46 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्ली आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे स्वातंत्र्यदिनी बॉम्बस्फोट घडवण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टोळीच्या सहा सदस्यांना अटक केली असून, यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या कटाचा मास्टरमाईंड कॅनडात राहणारा जीशान अख्तर असून, तो मुंबईतील बाबा सिद्दीकी खून प्रकरणाशीही जोडला गेला आहे. राजस्थान पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने ही मोठी कारवाई करत देशात मोठा घातपात टाळला.

या प्रकरणातील अटक करण्यात आलेले गुन्हेगार ७ जुलै रोजी पंजाबच्या शहीद भगतसिंग नगर येथे ग्रेनेड हल्ला करून फरार झाले होते. हा हल्ला घडवून आणल्यानंतर हे सर्व जण राजस्थानमधील जयपूर आणि टोंक जिल्ह्यांमध्ये लपले होते. राजस्थान पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेतला आणि अटक करून पुढील तपासासाठी त्यांना पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या टोळीने १५ ऑगस्ट रोजी दिल्ली आणि ग्वाल्हेर येथे बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखली होती. राजस्थान पोलिसांनी वेळीच कारवाई करून हा कट उधळला, अन्यथा स्वातंत्र्यदिनी मोठी जीवित आणि वित्तहानी होऊ शकली असती. चौकशीत असेही समोर आले की, कॅनडात राहणारा जीशान अख्तर हा या टोळीला सोशल मीडियाद्वारे सूचना देत होता. त्यानेच पंजाबमधील ग्रेनेड हल्ल्यासाठी गुन्हेगारांना ग्रेनेड पुरवले होते.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, जीशान अख्तरने पाकिस्तानातील गुन्हेगार शहजाद भट्टी आणि मनू अगवान यांच्याशी हातमिळवणी केली आहे. हे गुन्हेगार पंजाबमधील गोपी नवा शहरियाच्या टोळीसोबत मिळून देशातील बेरोजगार तरुणांना पैशाचे आमिष दाखवून गुन्हेगारी कारवायांसाठी वापरत होते. या टोळीने तरुणांना गुन्हेगारी विश्वात ओढण्यासाठी आर्थिक प्रलोभनांचा वापर केला. अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी तीन सज्ञान आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: सोनू उर्फ काली (कपूरथला, पंजाब), जितेंद्र चौधरी (टोंक, राजस्थान), संजय (हनुमानगढ, राजस्थान), उर्वरित तीन अल्पवयीन आरोपींची ओळख कायद्यामुळे जाहीर करण्यात आलेली नाही.

स्वातंत्र्यदिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी घातपाताचा कट उधळून लावल्याने राजस्थान पोलिसांचे कौतुक होत आहे. या कारवाईमुळे देशातील संभाव्य मोठा धोका टळला असून, पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुढील तपासात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या गुन्हेगारी नेटवर्कचे आणखी धागेदोरे उघड होऊ शकतात.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!