---Advertisement---

मंत्रीपद गेल्यावर देखील सरकारी बंगल्याचा वापर ; करुणा शर्मांचा सणसणीत इशारा

By team
On: August 13, 2025 3:23 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईत तीन आलिशान फ्लॅट असतानाही मुंडे सरकारी निवासस्थान ‘सातपुडा’मध्ये राहत असल्याचा दावा करुणा यांनी केला आहे. यापूर्वी मुंडे यांनी मुंबईत स्वतःचे घर नसल्याने सरकारी बंगल्यात राहत असल्याचे सांगितले होते. मात्र, करुणा शर्मा यांनी त्यांच्या या दाव्याला छेद देताना मलबार हिल, पवई आणि सांताक्रुझ येथे मुंडेंच्या नावावर फ्लॅट असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

करुणा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. “धनंजय मुंडे जनप्रतिनिधी असताना खोटं बोलत आहेत. त्यांच्याकडे मलबार हिल आणि पवईत फ्लॅट आहेत, ज्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे. मी सध्या राहत असलेला सांताक्रुझमधील फ्लॅटही त्यांचाच आहे. जर त्यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहायचं असेल, तर सांताक्रुझच्या फ्लॅटमध्ये येऊन राहावं. मी दुसरीकडे भाड्याने घर घेऊन राहते. पण सरकारी बंगला तातडीने सोडा,” असा थेट इशारा करुणा यांनी दिला आहे.

त्यांनी पुढे म्हटलं, मुंडे म्हणतात की मुलीच्या शिक्षणासाठी आणि प्रकृतीच्या कारणास्तव ते सरकारी बंगल्यात राहतात. पण ही केवळ थाप आहे. त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल, असं वाटत असेल तर ते स्वप्न आहे. त्यांची आमदारकीच धोक्यात आहे. त्यामुळे सांताक्रुझचा फ्लॅट आहे, तिथे येऊन राहा आणि सरकारी निवासस्थान तातडीने रिकामं करा.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात गिरगाव चौपाटीवरील एन.एस. पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत त्यांच्या नावे घर असल्याचा उल्लेख आहे. मात्र, हे घर सध्या वापरात नसल्याची माहिती आहे. याउलट, मुंडे यांनी मुंबईत स्वतःचे घर नसल्याने ‘सातपुडा’ बंगल्यात राहत असल्याचे सांगितले होते. करुणा शर्मा यांच्या ताज्या दाव्याने मुंडे यांच्या या विधानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धनंजय मुंडे यांचे कृषिमंत्रिपद गेल्यानंतर तब्बल पाच महिने उलटले, तरी त्यांनी ‘सातपुडा’ हे सरकारी निवासस्थान रिकामे केलेले नाही. यावरून त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे मुंडे यांच्या मालमत्तेच्या दाव्यांबाबत आणि सरकारी सुविधांच्या वापराबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!