ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर मुख्यमंत्र्यांसह आमदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही ; मनोज जरांगे पाटील !

हिंगोली : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबई येथे मराठा समाज धडकणार आहे, या मोर्चात एकाही तरुणाला काठी लागली तर मराठा समाज मुख्यमंत्र्यांसह आमदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथे दिला आहे. हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आमची लढाई सुरू आहे. या मागणीसाठी आता राज्यातील सर्व मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत. मुंबईमधील नागरिकांना त्रास व्हावा हा आमचा उद्देश नाही. आमच्या आरक्षणाच्या मागणीचा त्यांनाही फायदा होणार आहे. आम्हाला न्याय देणारी मुंबई आहे प्रत्येक जण न्यायासाठी मुंबईत आंदोलन करतात. त्यानुसारच आमचे आंदोलन आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आंदोलनासाठी सरकारला दोष द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यामध्ये ओबीसी व मराठा यांच्यामध्ये वाद पेटवला जात आहे. मात्र आपण सर्व एकाच गावात राहतो. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. त्यामुळे आपसामध्ये वाद करून घ्यायचं नाही असेही त्यांनी सांगितले. राज्यातील इतर समाजाने त्यांच्या प्रश्नांसाठी मदत मागितली तर त्यांच्या प्रश्नासाठी ही आंदोलन करणार असल्याची ही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कोणालाही पाडा किंवा निवडून आणा असे म्हटले नाही. कारण सत्ताधारी व विरोधक कोणीही आरक्षण देतो असे म्हटले नव्हते. त्यामुळे आम्हाला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार हे स्पष्ट दिसत होते. मात्र मराठा दलित मुस्लिम हे समीकरण जुळले असते तर वेगळे चित्र पहायला मिळाले असते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप संपवण्यासाठी आलेला माणूस असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची आश्वासन दिले होते मात्र कर्जमाफी का केली नाही असा सवालही त्यांनी केला. फडणवीस यांना केवळ सत्ता पाहिजे हा माणूस राज्याला घातक असल्याचेही त्यांनी आरोपात म्हटले आहे. त्यांनी आधी मोठे पक्ष फोडले आता छोटे पक्ष संपवत आहेत त्यामुळे राज्यातील छोट्या पक्षांनी सावध व्हायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

मराठा आंदोलन मुंबईत आल्यानंतर पोलीस पाहून घेतील असा फडणवीस यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. फडणवीस यांनी आम्हाला धमकी देऊ नये. आमच्या नादाला अजिबात लागू नये आंदोलनामध्ये एकाही तरुणाला काठी लागली तर राज्यातील मराठा समाज मुख्यमंत्र्यांसह मंत्री व आमदारांना राज्यभरात फिरणे बंद करेल एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त करतील असा इशाराही त्यांनी दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!