---Advertisement---

पावसाचा जोर वाढला : नदीच्या पुरात चारचाकी गेली वाहून ; एकाचा मृत्यू

By team
On: August 18, 2025 3:35 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून बीड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, परळी तालुक्यात एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. पुण्याहून दिग्रसकडे लग्न समारंभासाठी निघालेली एक कार लिंगी नदीच्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला, तर तिघांना प्रशासनाने यशस्वीपणे वाचवले आहे.

परळी तालुक्यातील कवडगाव हुडा शिवारातील तेलसमुख रोडवरील लिंगी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पुण्याहून दिग्रसकडे लग्नासाठी निघालेल्या चारचाकी वाहनातील प्रवाशांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने चालकाने थेट पुलावरून गाडी पाण्यात घातली. मात्र, पाण्याच्या प्रचंड वेगामुळे कार वाहून गेली. या कारमधील विशाल बल्लाळ (मृत), अमर पोळ, राहुल पोळ, आणि राहुल नवले हे प्रवासी होते.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. सुमारे १२ तास चाललेल्या या मोहिमेत अमर पोळ, राहुल पोळ, आणि राहुल नवले यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, विशाल बल्लाळ बेपत्ता होता. शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह लिंगी नदीच्या पुलापासून २ किमी अंतरावर सापडला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बीड आणि परळी तालुक्यात शुक्रवार (१६ ऑगस्ट) आणि शनिवार (१७ ऑगस्ट) सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सरस्वती नदी आणि जिरेवाडी नदी दुथडी भरून वाहत आहेत. परळी शहरातील आझाद चौक ते पंचायत समिती कार्यालय रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. आंबेवेस भागातून वाहणारी सरस्वती नदी उग्र रूप धारण करून वाहत असून, नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!