मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाले. सर्व महिलांच्या आशीर्वादामुळे आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. मात्र, काही लोकांचे अजूनही समाधान झालेले नाही. ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत. ते रोज मत-चोरी-मत-चोरी असे ओरडत आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यात थोडी अक्कल येण्यासाठी लाडक्या बहिणींनी त्यांच्यासाठी 25% आशीर्वाद मागावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपच्या वतीने आयोजित राखी प्रदान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मतचोरी झाले झाले असे ते म्हणत आहेत. मात्र, वास्तविक त्यांचे डोकेच चोरी झाले आहे. त्यातले ‘दिमाग’ चोरी झाले आहे. त्यामुळे माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की, त्यांनी 25% आशीर्वाद त्यांच्यासाठी मागावे. त्यामुळे यांच्या डोक्यात थोडी अक्कल येईल. कारण खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील, तर यांच्यापेक्षा मोठे चोर दुसरे कोणीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक संपल्यानंतर योजना बंद होतील, असा दावा हे लोक करत होते. मात्र निवडणूक झाली यांनी सांगितलेले दोन ते चार महिनेही झाले तरी ही योजना सुरु आहे. त्यामुळे ही योजना पाच वर्षे बंद होणार नाही, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. इतकेच नाही तर पुढील पाच वर्षे महिलांच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आले तर या योजना कायम सुरू राहतील. मात्र त्या पुढे नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात तुलनात्मक परिवर्तन होणार आहे. त्या नंतर महिलांच्या माध्यमातूनच सरकार चालवले जाईल, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
लाडक्या बहिणीच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर त्यांच्यापेक्षा मोठे चोर दुसरे कोणी नाही. त्यांची चिंता करण्याचे कारण नाही. हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते. आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. मात्र त्यांना परदेशात कोणी विचारले नाही आणि बिहारमध्ये देखील कोणी विचारणार नाही. महाराष्ट्रात झाली तशीच परिस्थिती बिहारमध्ये देखील विरोधकांची होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.