ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? ;उद्धव ठाकरेंची तिखट टीका !

मुंबई : वृत्तसंस्था

पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळण्याच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तिखट हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरम सिंदूरची आता थंडी कोल्ड्रिंक झाली आहे. मोदींनी रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत असे पाकला सांगितले. मग आता पाकसोबत रक्त आणि क्रिकेट कसे एकत्र वाहू शकते? असा खडा सवाल त्यांनी या प्रकरणी मोदींना उद्देशून केला आहे.

उद्धव ठाकरे शनिवारी शिक्षकांच्या येथे आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पाकसोबत क्रिकेट खेळण्याच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, लोक कबुतरांसाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात. चांगली गोष्ट आहे. कुत्रे व हत्तीणीसाठीही लोक रस्त्यावर उतरतात. चांगली गोष्ट आहे. माणुसकी पाहिजे. भुतदया पाहिजे. पण हीच भुतदया व माणुसकी त्या पहलगाममध्ये आपले जे नागरीक मारले गेले, जे सैनिक शहीद झाले, ज्या आपल्या माता-भगिनींचा सिंदूर पुसला गेला, त्यांच्यासाठी कुठे गेली होती?

ते पुढे म्हणाले, पहलगाम हल्ल्याला 2-3 महिने झाले नाही. त्यानंतर आपल्या संरक्षणमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूर संपले नाही तर स्थगित करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी रक्त व पाणी एकत्र वाहू शकत नाही असे सांगितले. आनंदाची गोष्ट आहे. माझ्या अंगात रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे असे ते म्हणाले. मग त्या गरम सिंदूरचे आता कोल्ड्रिंक झाले का? त्यांचा चाय गरम आता थंडा लिंबू शरबत झाला का? हा गरम सिंदूर कुठे गेला? तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायला परवानगी देता?

आपल्या देशाची टीम पाकसोबत क्रिकेट खेळणार असेल, तर तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? हा सिंदूर तुम्ही घरोघरी जाऊन वाटणार होता. तो सिंदूर कुठे गेला? तो लावायचा कुठे. कशाला या भाकडकथा करता तुम्ही. तिकडे सैनिकांनी शौर्य गाजवले व इकडे तुम्ही श्रेय घेता. सोफिया कुरेशी या महिला लष्करी अधिकाऱ्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. त्या महिला अधिकाऱ्यावरही भाजपने अतिरेक्यांची बहीण म्हणून टीका केली. लाज वाटत नाही या लोकांना देशभक्तीचे थोतांड गाताना.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही कशाला जगभरात शिष्टमंडळ पाठवली होती? त्यांनी शिवसेनेचाही प्रतिनिधी न सांगता घेतला. पण आम्ही हे शिष्टमंडळ देशासाठी असल्यामुळे काही हरकत घेतली नाही. देशासाठी आम्ही वाटेल ते करू. त्यांनी विरोधी पक्षांचे एकेक खासदार घेतले आणि जगभर पाठवले. आमची लढाई ही पाक व दहशतवादाविरोधात असल्याचे पटवून देण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठवण्यात आले. काय प्रतिसाद मिळाले हे कुणालाच माहिती नाही. या लढाईत एकही देश भारताच्या पाठीमागे उभा राहिला की नाही. मग कशाला पाठवली शिष्टमंडळं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!