---Advertisement---

महायुती सरकारला जरांगे-पाटील यांचा नवा अल्टीमेटम

By team
On: August 25, 2025 3:40 PM
Follow Us:
---Advertisement---

जालना : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपाेषणाचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्‍यात येणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे गणेश आगमनादिवशी बुधवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगितले. ते आज (दि.२५) अंतरवली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अंतरवाली सराटी ते मुंबईच्या प्रवासात जरांगे पाटील आणि कार्यकर्ते बुधवारी २७ ऑगस्ट रोजी मुक्काम शिवनेरी येथे, तर २८ ऑगस्टला सकाळी चाकणहून लोणावळा, वाशी, चेंबूर मार्गे सायंकाळी आझाद मैदानावर पोहोचण्याची योजना आहे. दरम्यान माळशेज घाटाचा मार्ग टाळण्यात आला आहे. मुलांना त्रास होऊ नये म्हणून प्रवासाची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील हजारो रस्त्यांपैकी कोणताही एक रस्ता सरकारने आंदोलकांना आझाद मैदानापर्यंत दिला जावा, अशी मागणी देखील जरांगे-पाटील यांनी यावेळी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. मराठा आणि कुणबी एक आहेत, हा अध्यादेश आम्हाला मंजुरीसह अंमलबजावणी करून पाहिजे. हैदराबाद गॅझेट लागून करून पाहिजे, तुम्ही कारणं सांगणार ते आम्ही ऐकणार नाही. आमच्या नोंदी सरकारी आहेत, त्याला विरोध करण्याचा विषय नाही. आमच्या नोंदी सरकारी आहेत, त्याला विरोध करण्याचा विषय नाही. आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करून पाहिजे, त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी राज्‍य सरकारला दिला.

मराठा आणि कुणबी एक आहेत, हा अध्यादेश मंजुरीसह अंमलबजावणी करावी, तसेच हैदराबाद गॅझेट लागू करावा, अशी प्रमुख मागणी आहे. सगे सोयरे कायद्याची दीड वर्ष झाली तरी अंमलबजावणी का केली नाही, असा सवाल करत सरकारच्या हातात आज फक्त दोन दिवस आहे. सरकारने महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांना वेठीस धरू नये. सरकारने आडमुठ्याच्या भूमिकेत जाऊ नये. मला उद्यापासून बोलायचं नाही. आता चर्चा बंद होणार आहे, असेही जरांगे पाटील म्‍हणाले.  मनोज जरांगे पाटील यांनी मागील दोन वर्षांत सातवेळा आमरण उपोषण करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन केले आहे. यावेळीही त्यांनी सरकारला आव्हान दिले आहे की, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील पळसगाव येथे सकल मराठा समाजाची चावडी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मुंबईला जाण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली असून, मराठा समाज एकजुटीने आपल्या मागण्यांसाठी पुढे सरसावला आहे. आंदोलनाच्या या निर्णायक टप्प्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सरकारने मागण्या मान्य करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!