ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऑपरेशन सिंदूरचे यश हे आत्मनिर्भरतेचे फलित

विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेचा समारोप

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

ऑपरेशन सिंदूरमधील विजय हा भारताच्या आत्मनिर्भरतेचा ठसा आहे. या पराक्रमाकडे पुढील पिढीने प्रेरणादायी नजरेने पाहावे आणि तरुणांनी देशसेवेकडे वळावे,असे प्रतिपादन सेवा निवृत्त विंग कमांडर अविनाश मुठाळ यांनी केले. अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प गुंफताना ऑपरेशन सिंदूर , पराक्रम अद्‌भुत या विषयावर सेवा निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट आणि मुठाळ यांनी थरारक व माहितीपूर्ण व्याख्यान दिले. सुरुवातीला बापट यांनी कारवाईची पार्श्वभूमी स्पष्ट केली, तर मुठाळ यांनी एलईडी प्रेझेंटेशनद्वारे युद्धजन्य परिस्थितींचे जिवंत चित्र नागरिकांसमोर उभे केले.

मुठाळ म्हणाले की, ‘सिंदूर’ ही संकल्पना भगवद्गीतेतून प्रेरित आहे. आपण आपल्या घरात राहून पाकिस्तानमध्ये घुसून हल्ले केले आणि त्यासाठी वापरलेली शस्त्रेही आपणच बनवली. हे आत्मनिर्भर भारताचे खरे यश आहे. या कारवाईदरम्यान पाकिस्तानला टर्की, उझबेकिस्तान व चीनकडून मदत मिळाली होती, तरीही भारतीय सैन्याने सर्व हल्ले परतावून लावले. पाचशे ड्रोन निकामी करून शत्रूचे तब्बल शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले. भारताने या लढाईत कोणतेही नुकसान सोसले नाही, उलट शत्रूला मोठा धक्का दिला. पाकिस्तानी मानसशास्त्रीय युद्धालाही भारताने तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले.

पुढे ते म्हणाले की, या विजयामागे केवळ सैन्यच नव्हे, तर भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन आणि तंत्रज्ञानही आहे. विशेष म्हणजे एआय तंत्रज्ञानाचा वापर आपण पाच-सहा वर्षांपूर्वीपासून संरक्षण क्षेत्रात सुरू केला आहे, त्यामुळेच या मोहिमेत यश मिळाले. ऑपरेशन सिंदूर हे १४० कोटी भारतीयांच्या एकतेचे फलित आहे,असेही ते म्हणाले.

समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी वसुधंरा मुठाळ, प्रवीण शहा, शिवकुमार वाले, पत्रकार मारुती बावडे, बाबासाहेब निंबाळकर, राजेश जगताप,स्वामीराव गायकवाड, नंदकुमार जगदाळे, अरविंद पाटील, रमेश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन बापूजी निंबाळकर यांनी केले, वक्त्यांचा परिचय कल्पना स्वामी यांनी करून दिला, तर आभारप्रदर्शन खंडेराव घाटगे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!