---Advertisement---

युवकांनी सुशीलकुमार शिंदे यांचा आदर्श घेऊन कर्तृत्ववान बनावे

By team
On: September 4, 2025 5:25 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत संघर्षाच्या जोरावर मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल अशा उच्च पदांपर्यंत मजल मारली. युवकांनी त्यांचा आदर्श घेऊन ध्येयवादी व कर्तृत्ववान बनावे,असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले.

सलगर (ता. अक्कलकोट) येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सप्ताहाअंतर्गत विद्यार्थ्यां, पालक व शिक्षक आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन शटगार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या शिबिरात दंतचिकित्सक डॉ. मंगेश शहा यांच्या पथकाने विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांची तपासणी करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शरणसप्पा कालिबत्ते होते.

यावेळी व्यासपीठावर डॉ. मंगेश शहा, अनिल कुडक्याल, डॉ. जहांगीर शेख, बाळ दळवी, मुख्याध्यापक गौरीशंकर तोळनूरे, पालक परमेश्वर पौळ, गुरुनाथ किणगी, नीलकंठ शिंगे, काशिनाथ गवंडी, चरणबसप्पा कलशेट्टी, शोभा चिक्कळी,रेश्मावती कलकोटे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुढे बोलताना शटगार म्हणाले,सुशीलकुमार शिंदे हे आजच्या युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. साध्या कुटुंबातील मुलगा योग्य शिक्षण, चिकाटी व प्रामाणिक परिश्रमांच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च पदांवर पोहोचू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. युवकांनी या जीवनचरित्रातून धडा घ्यावा आणि समाजकारणासोबतच स्वतःच्या जीवनात प्रगती साधावी. यावेळी डॉ. मंगेश शहा यांनी आरोग्यविषयक उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नीलकंठ शिंगे यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जनजागृती तर झालीच, शिवाय सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवनातून युवकांना मार्गदर्शन घेण्याचा संदेशही मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!