ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हवामान विभागाचा महाराष्ट्राला पुन्हा अलर्ट : अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाचा धोका आहे. या दोन राज्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची भीती असून, शहरी भागात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, कोंकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना बळ मिळेल, मात्र अतिवृष्टी झाल्यास शेतीसह जनजीवनावर परिणाम होऊ शकतो.

अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, नागालंड, मणिपूर, मिजोरम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका हवामान खात्याने वर्तविला आहे. याशिवाय उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्येही जोरदार पावसाचा अंदाज असून, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि चंदीगड या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमध्ये पावसामुळे वाहतुकीची कोंडी, जलसंचय आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांना पावसाचा फायदा होऊ शकतो, परंतु काही भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!