मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारसाठी मंत्री छगन भुजबळ हे डोकेदुखी ठरत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी केली. छगन भुजबळ महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सरकारनेच त्यांना तुरुंगाबाहेर काढले होते. आता ते सरकारलाच घातक ठरत असतील तर त्यांना पुन्हा तुरुंगात टाका, असे ते म्हणालेत.
छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारने मराठा आरक्षणासंबंधी काढलेला जीआर रद्द करण्याचा किंवा त्यात योग्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच सरकारलाही भुजबळांवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे बुधवारी याविषयी बोलताना म्हणाले, छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे सरकार व मराठा समाजातील तणाव वाढू शकतो. भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत.
छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्याहून मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावे. मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर मराठा समाज व सरकारमधील ताणतणाव कमी होत आहे. भुजबळांमुळे तो पुन्हा वाढू नये. विशेषतः भुजबळांमुळे आपल्याला डाग लागू नये याची काळजी फडणवीसांनी घ्यावी. अन्यथा त्यांना पुन्हा तुरुंगात जाऊ देणेच चांगले. कारण, तुम्हीच (सरकार) त्यांना बाहेर आणले. आता ते तुम्हाला घातक ठरणार असतील तर त्यांना पुन्हा तुरुंगात टाका. तेच बरे. अन्यथा संपूर्ण महायुती सरकारला भुजबळ डाग लावू शकतात, असे ते म्हणाले.
भुजबळांना सत्ता, प्रसिद्धी व चलतीची माज-मस्ती आहे. सरकारचे नाही माझेच ऐका असे त्यांचे म्हणणे आहे. ते काय सरकारचे बाप आहेत का? त्यांनाच सगळी अक्कल आहे का? सरकारला काहीच अक्कल नाही का? ते बिनडोक आहेत. त्यांनी त्यांना सोडवून आणले. पण आज तेच भुजबळ सरकारसाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरत आहेत, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.
मनोज जरांगे यांनी यावेळी ओबीसी उपसमितीवरही निशाणा साधला. ओबीसी उपसमिती ही जातीवाद करण्यासाठी असू नये. गोरगरीब मायक्रो ओबीसींसाठी या उपसमितीच्या माध्यमातून काम व्हावे. समिती जातीवादी दिसणार नाही याची काळजी घेतली जावी. मराठ्याच्या उपस्थितीमध्ये ओबीसीचे मंत्री घेतले जातात. ओबीसीच्या उपसमितीमध्ये मराठ्यांचा एकही मंत्री नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.