ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण: नर्तकीवर गंभीर आरोप

बीड : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेमागील कारणांबाबत दररोज नवे खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी एका नर्तकीवर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराईतील एका कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी गोविंद बर्गे यांचे मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात गोविंद यांनी पूजावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. महागडे दागिने, मोबाईल, गाड्या आणि पूजाच्या नातेवाईकांसाठी जमीन खरेदी – अशा विविध माध्यमातून त्यांनी लाखो रुपयांची मदत केली. मात्र, या नात्याला कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा पूजाने गोविंद यांच्यावर गेवराईतील बंगला आपल्या नावे करण्यासाठी दबाव टाकला. गोविंद यांनी याला नकार दिला, त्यानंतर पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं. यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या गोविंद यांनी तिच्या घरी जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथेही संवाद न झाल्याने त्यांनी आपल्या कारमध्ये बसून गोळी झाडून आत्महत्या केली.

या प्रकरणात आता गोविंद यांचे निकटवर्तीय शिंदे यांनी नवा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, “पूजा गायकवाड आणि तिच्या नातेवाईकांकडून गोविंदवर सातत्याने दबाव टाकला जात होता. त्याला धमक्या मिळत होत्या. पूजा तिचे कला केंद्र सुरू करू इच्छित होती, त्यासाठी गोविंदने तिला ८ लाख रुपये दिले होते. शिवाय तिच्या सासरच्या घराच्या बांधकामासाठीही त्याने आर्थिक मदत केली होती. गोविंद अत्यंत तणावात होता आणि शेवटी त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!