ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री गडकरींचे मोठे विधान : वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले की…

नागपूर : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री नितीन गडकरी आपल्या कामामुळे व विधानामुळे नेहमीच चर्चेत येत असतांना आता आणखी एक मोठे विधान मंत्री गडकरी यांनी केले आहे.  वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटले की, आपणही त्याला घोडाच म्हणायचे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सरकार व प्रशासकीय कार्यपद्धतीवर खंत व्यक्त केली. सरकारमध्ये काम करताना जे वरिष्ठ सांगतात तेच करायचे असते. अधिकाऱ्यांवर नेत्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्याचा दबाव असतो, असेही ते यावेळी म्हणाले.

नितीन गडकरी यांचा स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. राजकारणात असलेली त्यांची स्पष्ट व थेट बोलण्याची शैली त्यांना इतर नेत्यांपासून वेगळी करते. ते आपले मत कोणत्याही दडपणाशिवाय थेट मांडतात. त्यातून अनेकदा वादही निर्माण होतात. पण त्यानंतरही गडकरी सातत्याने सरकार व प्रशासनातील कच्च्या दुव्यांवर भाष्य करताना दिसून येतात. त्याची प्रचिती नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात पुन्हा एकदा आली.

नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात सरकारी व्यवस्था व तेथील उदासिनतेवर भाष्य करत सरकारी कामकाजात पारंपरिक पद्धतीपेक्षा आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काम करणे फार आव्हानात्मक असल्याचे नमूद केले. ते यासंबंधी एक उदाहरण देत म्हणाले, एका मलेशियन इंजिनिअरने डिस्टन्स टेक्नॉलॉजी आणली होती. त्यांनी स्टील फायबरमध्ये बीम तयार केले. या बीममुळे दोन पिलरमधील अंतर 120 मीटरपर्यंत वाढवता येत होते. पण हे तंत्रज्ञान आपल्या देशात आणताना व ते मंजूर करून घेताना मला खूप प्रयत्न करावे लागले. सरकारमध्ये एखादी गोष्ट चुकीची असेल किंवा कालबाह्य झाली असेल तरीही हे असेच चालवा असे सांगण्यात येते.

सरकारी व्यवस्थेत एक वेगळाच माहोल असतो. तिथे सिनिअर जे सांगतील तेच खरे मानायचे असते. त्यावर इकडे – तिकडे पाहायचे नसते. वरिष्ठ एखाद्या गाढवाला घोडा म्हणाले तर आपणही त्याला घोडाच म्हणायचे. कारण, बॉस इज ऑलवेज करेक्ट हे सूत्र तिथेही चालते. गडकरींनी यावेळी सरकारी कंत्राट पद्धतीवरही भाष्य केले. प्रत्येकाने चांगले काम करायला हवे. त्याचे श्रेय निश्चितच मिळते. पण राजकारण्यांचे जवळचे कंत्राटदार, आर्किटेक्ट यांना काम द्या, त्याला काम देऊ नका, असा दबावही अधिकाऱ्यांवर असतो. त्यातून मार्ग काढत आपण चांगल्या दर्जाचे काम करण्याची गरज असते, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!