मुंबई : वृत्तसंस्था
भाजपमध्ये आता हुकूमशाहीचं वातावरण असून, विरोधकांबरोबरच स्वपक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांनाही दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांनी भाजप नेते केशव उपाध्ये आणि माधव भंडारी यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली असून, “मराठी माणसाने सतरंज्या उचलायच्या आणि मलिदा मात्र उपऱ्या मोहित कंबोजला मिळणार,” अशा शब्दांत खदखद व्यक्त केली आहे.
अंधारे यांनी सोमवारी ट्विट करत भाजपच्या आतल्या कार्यसंस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ही भाजप अडवाणी-वाजपेयींची नाही, ही फडणवीस-मोदी यांनी उध्वस्त केलेली भाजप आहे. ही पक्ष आता विरोधकांना पचवत नाही आणि सत्ताधारी स्वपक्षातील कार्यकर्त्यांनाही लाथाडते,” असे त्या म्हणाल्या.दरम्यान, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही भाजपवर आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “भाजपमधून व्हीआरएस घेतलेल्या बिल्डर-राजकारण्याला लागोपाठ SRA प्रकल्प कसे मिळतात?” असा थेट सवाल करत त्यांनी सरकारवर लक्ष केंद्रीत केले.
सध्या मोहित कंबोज यांनी सक्रीय राजकारणातून अंग काढून घेतले असले, तरीही त्यांना मुंबईतील महत्त्वाचे एसआरए प्रकल्प मिळत असल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला जात आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपवर नवा हल्ला चढवला आहे.