मुंबई : वृत्तसंस्था
कुलाबा येथील डॉक यार्ड येथे कार्यरत असलेला नौदल जवान सुरजसिंह चौहान अचानक गायब झाले होते. 7 सप्टेंबरपासून ते बेपत्ता होते. पोलिस पथक सुरजसिंह चौहान यांचा शोध घेत असताना त्यांना एक मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह सुरजसिंह चौहान यांचाच असल्याचे निदर्शनास आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि.२९ मे रोजी कुलाबा येथील डॉकयार्ड येथे नेमणूक झालेले सुरजसिंह चौहान 7 सप्टेंबरपासून रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. ते त्या दिवशी पहाटे पाच वाजता घरातून बाहेर पडले होते, मात्र काही वेळाने त्यांचा फोन बंद झाल्याने नौदलाच्या अधिकाऱ्यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुरजसिंह चौहान यांचा शोध सुरू केला. सुरजसिंह चौहान यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन शोधण्यात आले असता त्यांचे शेवटचे लोकेशन हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भिवपूरी स्टेशन रोड परिसरात होता. त्यानुसार पोलिसांचे पथक सुरजसिंह चौहान यांचा शोध घेण्यासाठी तिथे पोहोचले व संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यानुसार काही पुरावे देखील पोलिसांना मिळत गेले.
थोड्या वेळाने पोलिसांना माथेरानच्या खालच्या पाली भूतवली धरणाजवळील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी शिताफीने हा मृतदेह ताब्यात घेतला, आणि तो नौदल अधिकारी सुरजसिंह चौहान यांचा असल्याचे पोलिस आणि रेस्क्यू टीमने सांगितले. आता पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. सुरज यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. सुरज हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून ते 33 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हे प्रकरण आत्महत्या की हत्या आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणे हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान असणार आहे.