---Advertisement---

राज ठाकरेंचा व्यंग चित्राच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल !

By team
On: September 17, 2025 12:04 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापले असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग चित्राच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘नक्की कोण जिंकलं?’ असा सवाल करत त्यांनी अमित शहा आणि जय शहा यांच्यावर सूचक टीका केली असून, या सामन्यामागील राजकीय आणि आर्थिक हित संबंधांवरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून देशभरात निर्माण झालेल्या राजकीय वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सहभाग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक व्यंगचित्र प्रसिद्ध करून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्यावर टीका केली आहे.

या व्यंगचित्रात “नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं?” असा रोखठोक सवाल विचारण्यात आला आहे. चित्रात अमित शहा आणि जय शहा भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना दाखवले आहेत, तर दुसऱ्या बाजूला पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीयांचे मृतदेह दाखवले आहेत. या माध्यमातून ठाकरे यांनी क्रिकेट सामन्यामागील राजकीय आणि आर्थिक स्वार्थावर उपरोधिक टीका केली आहे.

दरम्यान, पहलगाम येथे 26 भारतीयांचे प्राण गेले असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे योग्य आहे का, असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि अन्य विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, हे मोदींचे जुने विधान आठववत, विरोधकांनी मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे? असा सवाल उपस्थित केला. राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर पुन्हा व्यंगचित्र माध्यमातून आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या नव्या शैलीतील राजकीय टीकेची सध्या चर्चा जोरात आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!